Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 20 July 2011

चुकीचा जन्मदाखला दिल्याची देऊ बाणावलीकरांविरुद्ध तक्रार

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांनी पोलिस खात्यात भरती होताना चुकीचा जन्मदाखला दिल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. श्री. बाणावलीकर यांनी ४ वर्षांनी आपले वय कमी करून जन्मदाखला दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रार पोलिस महासंचालक, पणजी पोलिस, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक व पोलिस मुख्यालयाकडे करण्यात आली आहे.
तक्रारदार सुदीप ताम्हणकर यांनी माहिती हक्क कायद्याखाली मिरामार येथील धेंपे कला व विज्ञान महाविद्यालयाकडून मिळवलेल्या माहितीनुसार श्री. बाणावलीकर यांच्या जन्मदाखल्यावर जन्मतारीख ८ फेब्रुवारी १९५२ अशी आहे. तसेच, त्यांनी वेरे बार्देश येथील प्रगती शाळेत सादर केलेल्या जन्मदाखल्यात ८ फेब्रुवारी १९५२ अशीच जन्मतारीख असल्याचा दाखला या संस्थांनी माहिती हक्क कायद्याखाली दिला आहे.
तर, पोलिस भरतीवेळी त्यांनी पोलिस मुख्यालयात सादर केलेल्या जन्मदाखल्यावर आपली जन्म तारीख ८ फेब्रुवारी १९५६ असल्याचा दाखला दिला असल्याची माहिती श्री. ताम्हणकर यांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षकपदी भरती होताना श्री. बाणावलीकर यांनी बनावट जन्मदाखला दिला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिस भरतीवेळी श्री. बाणावलीकर हे ८ फेब्रुवारी १९५२ या जन्मतारखेनुसार २९ वर्षांचे होते. तर पोलिस भरती होण्यासाठी उमेदवार २१ ते २५ वयोगटातील असणे बंधनकारक होते. त्यामुळे त्यांनी आपण १९५६ साली जन्माला आल्याचा खोटा दाखला सादर करून सरकारला फसवल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ४६३, ४६४, ४६५, ४७१, ४१७, व ४२० या कलमानुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणातील वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत चौकशी केली जाण्याचीही विनंती तक्रारदाराने केली आहे.

No comments: