Saturday, 26 February 2011
‘सीबीआय’ चौकशीचा पर्दाफाश करणार
पर्रीकरांचा कॉंग्रेसला इशारा
‘इफ्फी-०४’ चे व्यवहार पारदर्शकच
पणजी, दि.२५ (प्रतिनिधी)
आपल्या विरोधातील ‘सीबीआय’ तक्रार कॉंग्रेस पक्षाच्या तत्कालीन प्रभारी मार्गारेट आल्वा व इतर काही नेत्यांनी रचलेले षड्यंत्रच होते. या षड्यंत्रात महालेखापाल कार्यालय व ‘सीबीआय’ चा गैरवापर करण्यात आला. यासंबंधीचे पुरावे प्राप्त झाल्यानंतर त्याचा योग्य वेळी पर्दाफाश केला जाईल, असा खुलासा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज केला. ‘इफ्फी-०४’ च्या पूर्ण व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यात आली होती व त्यामुळे या प्रकरणात आपण निर्दोष सुटणार याची पूर्वीच खात्री होती, असेही ते म्हणाले. आता आपण ‘आयनॉक्स’ सिनेमागृहात जाण्यास मोकळे झालो, असे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
राज्यसभेत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरात पर्रीकर यांच्याविरोधातील ‘सीबीआय’ चौकशीत काहीही आढळून आले नसल्याने ही चौकशी बंद करण्याची शिफारस केल्याचा खुलासा केला होता. ‘सीबीआय’ कडून ‘क्लीनचीट’ मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी ही माहिती दिली. मुळातच ज्या महालेखापालांच्या अहवालाचा आधार घेऊन आपल्याविरोधात ‘सीबीआय’ चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला त्या अहवालात कुणाचेच नाव घेण्यात आले नव्हते. सुरुवातीला खुद्द तत्कालीन माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ‘इफ्फी-०४’ च्या व्यवहारांची चौकशी करण्याची शिफारस ‘सीबीआय’कडे केली होती. ‘सीबीआय’ ने केलेल्या प्राथमिक चौकशीत काहीही आढळून आले नाही. या प्रकरणी ‘सीबीआय’कडून आपल्याला क्लीनचीट मिळाल्यास कॉंग्रेसची नाचक्की होणार यामुळे तत्कालीन कॉंग्रेसच्या प्रभारी मार्गारेट आल्वा यांनी काही स्थानिक नेत्यांना हाताशी धरून नव्याने ‘सीबीआय’ चौकशीचे षड्यंत्र रचले. माजी वीजमंत्री माविन गुदिन्हो यांनी यासंबंधी महालेखापालांच्या अहवालाच्या आधारावर आपल्याविरोधात पणजी पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केली व या तक्रारीवर ‘एफआयआर’ दाखल झाल्यानंतर तो ‘सीबीआय’ कडे पाठवण्यात आला. या कटात महालेखापाल व ‘सीबीआय’ यंत्रणेचाही गैरवापर झाला. यासंबंधी माहिती हक्क कायद्यानुसार माहिती देण्यास ‘सीबीआय’कडून नकार देण्यात आल्याने त्याला केंद्रीय माहिती आयोगाकडे दाद मागितल्याचेही त्यांनी सांगितले.
‘आयनॉक्स’ ची मालकी सरकारकडेच
एकूणच ‘इफ्फी-०४’ च्या पायाभूत सुविधांवर करण्यात आलेल्या खर्चाचे खोटे आकडे नाचवून काही नेते जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्याकडून सरकारी जमीन विकल्याचा जो आरोप झाला त्याचा खरपूस समाचार घेताना इथे कोणतीही जमीन विकली नसल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. ‘आयनॉक्स’ हे सरकारी मालकीचे सिनेमागृह आहे व त्याची मालकी माहिती व प्रसिद्धी खात्याकडे आहे. सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारा हा एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे राज्य सरकारला ३१ लाख रुपये भाडे व वर्षाकाठी ३० ते ४० लाख रुपये मनोरंजन कर प्राप्त होतो, अशी माहितीही त्यांनी दिली. उर्वरित पायाभूत सुविधांवर सगळाच खर्च सुमारे ८० कोटी रुपयांच्या आसपास झाला. आयनॉक्स सिनेमागृहाला आता सहा वर्षे झाली व या सिनेमागृह इमारतीचा दर्जा कायम आहे. ही सर्व कामे दर्जात्मकच होती. अलीकडेच सरकारने उभारलेल्या मॅकनिज पॅलेसची परिस्थिती काय बनली आहे त्यावरून आपल्या व विद्यमान सरकारच्या कामांचा दर्जा पडताळून पाहा, असे आवाहनही त्यांनी केले. कला अकादमीवर झालेल्या खर्चाचा विनाकारण बाऊ केला जातो. कला अकादमीवर झालेल्या २१ कोटी रुपये खर्चात १७ कोटी रुपये खर्चून संपूर्ण यंत्रणाच बदलण्यात आली होती याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
‘आयनॉक्स’ सिनेमागृहात जाण्यास मोकळे
जोपर्यंत ‘सीबीआय’ चौकशीतून निर्दोष मुक्त होत नाही तोपर्यंत आयनॉक्स सिनेमागृहात जाणार नाही, असा निर्धार आपण केला होता. फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांच्या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी एकदाच आपण तिथे गेलो होतो. आता आयनॉक्स सिनेमागृहात जाण्यास आपण मोकळा झालो आहे. एखादा चांगला चित्रपट प्रदर्शित झाला तर अवश्य जाईन असेही त्यांनी घोषित केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment