पणजी, दि. २६ (सांस्कृतिक प्रतिनिधी): समाजात आज अनैतिक गोष्टी प्रतिष्ठेच्या होत चालल्या आहेत. त्यामुळे समाज चुकीच्या पथावर मार्गक्रमण करीत असून भविष्याच्या दृष्टिकोनातून ते विघातक आहे, असे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.
कॅसिनो आज वविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. विद्यार्थी मंडळाचे विविध कार्यक्रम पुरस्कृत करून तो आपली पाळेमुळे घट्ट रोवू पाहत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणून २३ व २४ फेबु्रवारी रोजी कला अकादमीत रॉयल कॅसिनो पुरस्कृत ‘तत्त्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे पाहावे लागेल. यासंदर्भात बोलताना प्रा. वेलिंगकर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत होते.
समाजात वाईट गोष्टींबरोबर चांगल्या गोष्टीही आहेत. परंतु वाईट गोष्टींचा उदोउदो जास्त होत असल्याने चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नाहीत. देशातील नागरिकांच्या मनातील देशप्रेमाची भावना कमी व्हावी म्हणून ‘फुंदासांव ओरिएंट’ सारखी संस्था भरमसाठ पैसा खर्च करून येथील कलाकारांना, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या निमित्ताने पोर्तुगालला पाठवत आहे. तेथून हे लोक परत आल्यावर त्यांची एक नवीन पिढी तयार होते. हीच पद्धत कॅसिनोवाल्यांनी अवलंबली आहे. भावी पिढीसाठी हे घातक ठरणार आहे. त्यामुळे आत्ताच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. केवळ शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनीच नव्हे तर समाजातील सर्व लोकांनी याची दखल घेणे आवश्यक आहे. आज कॅसिनोने राजकीय लोकांच्या आधाराने टिकाव धरला असला तरी समाजाला लागलेली ही मोठी कीड आहे. वाईट मार्गाचा पैसा शिक्षण क्षेत्रात येता कामा नये यासाठी समाजानेच दक्ष असणे गरजेचे आहे. चारित्र्यसंपन्न मार्गदर्शकांच्या अभावामुळे आज सारासार विचार करणे लोप पावत चालले आहे, असेही प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले.
गोव्यात कॅसिनोंचे आक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात आधार निर्माण करण्यापर्यंत मजल मारली आहे. ही खरोखरच चिंतेची बाब आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही पालकही त्यास पाठिंबा देत आहेत. त्यावर कहर म्हणजे काही दिवसांपूर्वीच पणजी विद्यालयातील एका ७ वीच्या विद्यार्थ्याचा वाढदिवस त्याच्या पालकांनी कॅसिनो बोटीवर साजरा केला. कॅसिनो आज अनेक माध्यमांतून आपल्या घरापर्यंत पोचला आहे. उद्या आपलीच मुले त्यामध्ये गुंतणार नाहीत कशावरून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत अनेक मान्यवरांनी दै. ‘गोवादूत’शी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
प्रा. राधिका नायक
धेंपे महाविद्यालयाच्या प्राचार्य राधिका नायक म्हणाल्या, कॅसिनो, दारू या समाजाला पोखरू पाहणार्या गोष्टींचं कुठल्याही कार्यक्रमासाठी सहकार्य घेऊन त्यांची जाहिरात करणे समाजहिताचे नाही. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यापासून चार हात दूरच राहणे योग्य. आजचा विद्यार्थी उद्याच्या देशाचा ‘आधार’ आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर शिक्षकांचेही निरीक्षण असले पाहिजे.
सॅबिना मार्टिन्स
‘बायलांचो एकवोट’च्या अध्यक्ष सॅबिना मार्टिन्स म्हणाल्या, कॅसिनोंविरोधात आम्ही अनेकवेळा आवाज उठवला परंतु सरकारला जाग आली नाही. आता तर ही कीड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कॅसिनोविरोधात पेटून उठणे काळाची गरज बनली आहे. येत्या ८ मार्च रोजी महिला दिनादिवशी एक सभा घेऊन दारू आणि कॅसिनोंविरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
Sunday, 27 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment