थकबाकी वसुलीसाठी मुरगाव पालिकेचा इशारा
• दुकानदारांना ४ मार्चपर्यंत मुदत
वास्को, दि. २३ (प्रतिनिधी): शहरातील पालिका मार्केटमधील दुकान मालकांनी गेल्या काही वर्षांपासूनची थकबाकी ४ मार्चपर्यंत पालिकेच्या तिजोरीत जमा न केल्यास ह्या दुकानांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुरगाव नगरपालिकेची थकबाकी चार कोटींच्या आसपास पोहोचलेली असून दिलेल्या मुदतीत ही रक्कम न भरल्यास सदर दुकानांवर ७ मार्चपासून ‘सील’ ठोकण्यात येईल असा इशारा मुरगावच्या नगराध्यक्षा सौ. सुचिता शिरोडकर यांनी दिला आहे.
मुरगाव नगरपालिकेच्या भाजी मार्केट, पालिका मार्केट इत्यादींमध्ये असलेल्या दुकानांपैकी बहुतेक दुकान मालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाडे देणे बंद केले आहे. त्यामुळे पालिकेची चार कोटींपर्यंत थकबाकी अडकून राहिली आहे. पालिकेने ही थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न केले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले आहे. सदर थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका मंडळाने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला असून आज नगराध्यक्षा सौ. शिरोडकर, मुख्याधिकारी गोपाळ पार्सेकर तसेच पालिकेच्या इतर काही कर्मचार्यांनी मार्केटात भेट दिली. त्यांनी सदर थकबाकी ४ मार्चपर्यंत न भरल्यास दुकानांना सील ठोकण्याचा इशारा दिला. यावेळी काही दुकानदारांनी बोलणी करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र तो फेटाळून लावण्यात आला. यापूर्वी पालिका मंडळाने बोलणी व चर्चेसाठीच पाच वर्षांहून अधिक काळ गमावला असून त्यासाठी अधिक वेळ देण्यात येणार नसल्याचे नगराध्यक्षा सौ. शिरोडकर यांनी निक्षून सांगितले.
अधिक माहितीसाठी नगराध्यक्षा सौ. शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर दुकानदारांना ४ मार्चपर्यंत थकबाकी भरण्यास मुदत दिली असून शुक्रवार २५ रोजी भाजी मार्केटमधील दुकानदारांना याबाबत इशारा देण्यात येणार असल्याचे सांगितले. पालिकेची थकबाकी ४ कोटीहून जास्त असून ती वसूल करण्यासाठी येत्या काही दिवसांत कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे सौ. शिरोडकर यांनी सांगितले.
Thursday, 24 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment