Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 24 February 2011

बेदरकार खनिज वाहतुकीविरोधात आजपासून व्यापक कारवाई

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): वाहतूक खात्याने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खनिज मालाची वाहतूक करणार्‍या व सुरक्षित अंतर नियमांचे उल्लंघन करणार्‍या खनिज वाहतूक ट्रकांवर उद्या २४ पासून व्यापक कारवाई सुरू होणार आहे. पोलिस व जिल्हाधिकार्‍यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात येणार असून त्यात खनिज वाहतूक ट्रक जप्त करण्याची तयारीही सरकारी यंत्रणेने ठेवली आहे.
राज्यात खनिज वाहतुकीमुळे रस्ता सुरक्षा व धूळ प्रदूषणाचा मुद्दा प्रकर्षाने उभा राहिला आहे. विविध ठिकाणी स्थानिक जनता खनिज वाहतूकविरोधात बंडाचा झेंडा रोवून उभी ठाकल्याने सरकारसमोर पेच उभा राहिला आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता ओळखून तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवण्याचा धोका ओळखून वाहतूक खात्याने खाण, पोलिस व जिल्हाधिकार्‍यांच्या मदतीने खनिज वाहतुकीला शिस्त आणण्याची जोरदार मोहीम सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. खनिज वाहतुकीच्या बेदरकारपणाचे तीव्र पडसाद लोकलेखा समितीच्या बैठकीत उमटल्याने संबंधित अधिकार्‍यांना समितीकडून चांगलेच खडसावण्यात आल्याचीही खबर आहे. सध्या तूर्त अल्पकालीन कृती आराखडा तयार करून या वाहतुकीला आटोक्यात आणावे व तदनंतर सरकारने खनिज वाहतुकीबाबत दीर्घकालीन कृती आराखडा तयार करावा, अशी शिफारसही समितीने केल्याची खबर आहे.
उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
खनिज वाहतुकीच्या जटिल बनलेल्या या प्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी २५ रोजी खाण मालक तथा खनिज वाहतूकदारांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीला वाहतूक, खाण, पोलिस व जिल्हाधिकारीही हजर राहणार आहेत. या बैठकीत खनिज वाहतुकीमुळे उद्भवणार्‍या विविध प्रश्‍नांवर सखोल चर्चा केली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. खनिज वाहतुकीला योग्य पद्धतीने शिस्त लागावी व अन्य वाहन चालकांच्या मनातील सुरक्षेबाबतची भीती दूर व्हावी यासाठी या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

No comments: