Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 23 February 2011

आघाडीतून बाहेर पडण्याचे राष्ट्रवादीचे संकेत सुंठीवाचून खोकला गेला : कॉंग्रेस

आज दिल्लीत अंतिम निर्णय होणार
पणजी, दि.२२(प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे नेते मिकी पाशेको यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लावण्यास कॉंग्रेसकडून होत असलेली दिरंगाई आक्षेपार्ह असून त्यासाठी एकवेळ आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. आज यासंबंधी प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडे चर्चा केल्यानंतर उद्या २३ रोजी अंतिम निर्णय जाहीर करण्याची हमी त्यांनी या शिष्टमंडळाला दिली आहे.
याप्रकरणी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकारी मंडळ दिल्लीत गेले आहे. या एकूण प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्या २३ रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती मिकी पाशेको यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आघाडीचा पाठिंबा काढून घेतला तरीही सरकारच्या स्थिरतेवर मात्र त्याचा कोणताच परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीचे तीन आमदार वगळल्यास आघाडीची सदस्य संख्या २२ वर पोहोचणार असल्याने त्यांच्याकडे बहुमत राहणार आहे.
दरम्यान, दिल्लीत पोहोचलेल्या प्रदेश राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या सदस्यांनी श्री. पाशेको यांच्यामागे ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने श्रेष्ठींसमोरही पेच निर्माण झाला आहे. यासंबंधी राष्ट्रवादी श्रेष्ठींनी कॉंग्रेस श्रेष्ठींकडे चर्चा करून तोडगा काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केल्याचीही खबर मिळाली आहे. राज्यात राष्ट्रवादीचा संघटनात्मक विस्तार व इतर महत्त्वाच्या विषयांवरही उद्याच्या बैठकीत ऊहापोह होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते ए. पी. संगमा, निवेदिता माने हे या बैठकीला हजर होते. गोव्यातर्फे प्रदेश सरचिटणीस व्यंटकेश प्रभू मोने, प्रकाश फडते, सचिव आर्विन सुवारीस, अनिल जोलापुरे व लिंडन मोंतेरो आदी उपस्थित होते. येत्या १६ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून यामुळेच राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीकडून पाठिंबा काढून घेतला तर कॉंग्रेसला अन्य दोन आमदारांना मंत्रिपद देण्याची आयतीच संधी प्राप्त होणार आहे व त्यामुळे सरकार अधिकच मजबूत होईल. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा आघाडीला पूर्ण पाठिंबा आहे व त्यामुळे या दबावाला काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या नेत्यांकडून मिळते. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीकडून पाठिंबा काढून घेतल्यास ‘सुंठीवाचून खोकला गेला’ असेच म्हणावे लागेल, असाही टोला या नेत्यांनी लगावला आहे.

No comments: