Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 23 February 2011

शिरसईवासीयांनी खाणवाहतूक रोखली

खाणमालकांचा महामार्ग रोखण्याचा इशारा
म्हापसा, दि. २२ (प्रतिनिधी): शिरसई येथून बेदरकारपणे होणारी खाणवाहतूक आज (दि.२२) आज शिरसई रेल्वे स्थानकाजवळ स्थानिकांनी रोखली. यावेळी स्थानिकांनी या खाणवाहतुकीचा आपल्याला अतोनात त्रास होत असून या मार्गाने होणारी वाहतूक बंद करून दुसर्‍या मार्गाने वळवावी मात्र या रस्त्याने ती कोणत्याही परिस्थितीत होता नये अन्यथा पुन्हा असे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ऍड. श्रीधर कामत यांनी दिला. यावेळी यापुढे असे ट्रक अडवल्यास मुंबई महामार्ग म्हापसा वाळपई मार्गावरील वाहतूक अडवण्याचा इशारा खाणमालकांनी दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रेडी शिरोडा भागातून येणारे खनिजमाल घेऊन येणारे ट्रक आज सकाळी शिरसई येथील रेल्वे स्थानकाजवळ रोखले. यात ऍड. श्रीधर कामत, ऍड. विनायक परब, उपसरपंच आनंद तेमकर, ऍड. महेंद्र आनोर्णेकर, ऍड. वीरेंद्र कामत यांच्या नेतृत्वाखाली अडवण्यात आले. ही घटना कळताच उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर, मामलेदार गौरीश शंखवाळकर, म्हापसा पोलिस निरीक्षक राजेशकुमार पोलिस फौजफाट्यासह उपस्थित झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. रेडकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ही वाहतूक पूर्णपणे बंद केल्याशिवाय कोणतीच चर्चा करण्यात येणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. दुपारी तीन वाजल्यापासून शिरसई येथून वाहतूक सुरू केली. मात्र त्यावेळी स्थानिकांनी अडवलेल्या तीन ट्रकांचे टायर पंक्चर केले.
ट्रक पंक्चर केल्याचे ट्रकमालकांना कळताच सुमारे शंभर ट्रक मालक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी तेथून पळ काढला. त्यामुळे ट्रकमालकांनी आपला मोर्चा शिरसईकरांना जाब विचारण्यासाठी वळवला. यावेळी प्रकरण हातघाईवर आले होते. त्यामुळे येथील वातावरण काही काळ तंग बनले. यावेळी म्हापसा पोलिसांनी मध्यस्थी करून हा प्रकार रोखला व प्रकरण चिघळू दिले नाही.
यावेळी सदर ट्रकमालकांनीही म्हापसा वाळपई रस्त्यावरील वाहतूक अडवली. दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलिसांच्या विनंतीनुसार अडवलेली वाहतूक सोडण्यात आली. यानंतर ट्रकमालकांनी थिवी येथे बैठक घेत यापुढे असे ट्रक अडवल्यास म्हापसा-वाळपई व मुंबई महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा इशारा दिला.

No comments: