Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 21 February 2011

‘स्वतंत्र देशात मानसिक परिवर्तन गरजेचे’

‘छळाकडून बळाकडे ...’ विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन
पणजी, दि.२० (सांस्कृतिक प्रतिनिधी): स्वतंत्र देशात किंवा राज्यात केवळ शासकीय परिवर्तन होऊन चालत नाही तर मानसिक परिवर्तनही होणे आवश्यक आहे. आज याचीच कमतरता असल्याने अराष्ट्रीयकरणाचे प्रमाण वाढत आहे परंतु त्याचबरोबर राष्ट्रीकरणही होत असल्याने घाबरण्याचे कारण नाही. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी यांनी सांगितले. सांस्कृतिक वार्तापत्र व प्रेरणा आर्ट गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गोमंतकाच्या संघर्षमय इतिहासाचा वेध घेणार्‍या ‘छळाकडून बळाकडे ः गोवा मुक्ती ५०’ व स्व. श्रीराम कामत संपादित विश्‍वचरित्रकोषाच्या सहाव्या खंडाचे प्रकाशन तसेच गोवा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण गोव्यात होणार्‍या विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून फादर बेंटो रॉड्रिग्स (फादर आग्नेल आश्रमाचे प्रमुख दिल्ली), जयराम कामत, प्रेरणा ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर, सांस्कृतिक वार्तापत्राचे शैलेंद्र बोरकर, विशेषकंाचे अतिथी संपादक वल्लभ केळकर, वर्षभर होणार्‍या कार्यक्रमाचे राज्य संयोजक आनंद शिरोडकर, सुरेश देशपांडे, कोशाध्यक्ष राजेंद्र भोबे, सचिव सुभाष देसाई आणि सत्कारमूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. हरीजी पुढे म्हणाले की, अराष्ट्रीयकरणाचा प्रकार हा गेल्या अनेक सालांपासून सुरू असून ज्या देशाचा भाग गुलाम होतो तिथे अराष्ट्रीयकरण होणे स्वाभाविक आहे, असेही ते म्हणाले. भारत गुलाम व्हायला मुख्य कारण म्हणजे ‘सद्गुणविकृती’ समोरून येणार्‍या माणसाला ओळखणे आणि स्वतःला ओळखणे जमले पाहिजे, जे भारतीयांना जमले नाही. परंतु जपान, चिन या देशांना ते चांगले जमले. असे सांगताना त्यांनी पुराणातील राम व कृष्ण यांची उदाहरणे दिली. आजसुद्धा विरोधी शक्ती खुल्लम खुल्ला रूप घेऊन येऊ शकते. त्यांना ओळखता येणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या पिढीने सद्गुण विकृतीला फसून न जाता जागृत होणे महत्त्वाचे आहे. स्वतःबद्दल विचार करण्यास सक्षम असल्यास आम्ही खर्‍या अर्थाने स्वतंत्र आहोत असे म्हणता येईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आजच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याला एक अनोखा अनुभव मिळाल्याचे स्पष्ट केले.
स्वतंत्र गोव्यात अराष्ट्रीयकरणाचे प्रकार वाढत असून आज काही गोमंतकीयांचा आत्मा भ्रष्ट झाला आहे. त्यासाठी ‘छळाकडून बळाकडे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गोव्यात वर्षभर जागरण करणारा हा उपक्रम असल्याचे श्री. वेलिंगकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. यावेळी फादर रॉड्रिगीस यांच्या हस्ते ‘छळाकडून बळाकडे ः गोवा मुक्ती ५०’ विशेषांक तसेच विश्‍वचरित्रकोषाच्या ६ व्या खंडाचे प्रकाशन करण्यात आले. तर श्री. हरीजी यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी, नागेश करमली, डॉ. व्हेरीसिनो कुतिन्हा, मधुकर मोर्डेकर, चंद्रकांत केंकरे आणि फ्लावीयन डायस यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी फादर रॉड्रिगीस म्हणाले की, जो धर्म माणसामाणसांत विभागणी करतो तो धर्मच नव्हे. स्वातंत्र्य हे प्रत्येकाला हवे असते परंतु ते टिकवण्यासाठी एकजुटीने वावरणे आवश्यक आहे. देश सेवा ही देवाची सेवा आहे असेही त्यांनी सांगितले. या वेळी सुरेश देशपांडे यांनी मनेागत व्यक्त केले तर श्री. केळकर आणि शैलेंद्र बोरकर यांनी विशेषांकाविषयी भाषण केले. सत्कारमूर्तींच्या वतीने श्री. डायस यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुभाष देसाई यांनी स्वागत व परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा.अनिल सामंत यांनी केले. राजेंद्र भोबे यांनी आभार मानले.

1 comment:

krupa said...

i want the photographs of these programe