• नेते जाहीरनाम्यात व्यस्त
• आयरिश यांचा वेगळा जाहीरनामा
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): पणजी महापालिकेची दि. १३ मार्च रोजी होणारी निवडणूक तिरंगी व अटीतटीची होण्याची शक्यता आत्तापर्यंतच्या उमेदवारी अर्जांवरून दिसत आहे. सोमवार दि. २१ रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आज रविवार असल्याने कुणीही अर्ज भरला नाही, मात्र दि.१९ पर्यंत भरलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या (१८०) पाहता सत्तेसाठी बरीच चढाओढ होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण या निवडणुकीत राज्यातील प्रमुख तिन्ही पक्षांचे समर्थक पॅनल निवडणुकीत उतरलेली आहेत. कॉंग्रेस मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पाठिंब्याने सत्ता पुन्हा आपल्याचकडे राखण्यासाठी निवडणुकीत उतरलेली विद्यमान सत्ताधारी मंडळाची ‘पणजी विकास आघाडी’, भाजपच्या पाठिंब्याबरोबरच पणजीतील सर्वपक्षीय मान्यवर लोकांच्या पाठिंब्यावर पणजीच्या विकासासाठी सत्ता बदल हवाच, या उद्देशाने रिंगणात उतरलेले ‘ पणजी फर्स्ट’ व दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ म्हणत विद्यमान सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा साथीदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ‘टुगेदर फॉर पणजी’ अशी तीन पॅनल्स मैदानात उतरले आहेत. पणजी विकास आघाडीला बाबूश मोन्सेरात यांचे, पणजी फर्स्टला मनोहर पर्रीकर यांचे तर टुगेदर फॉर पणजीला प्रा. सुरेंद्र सिरसाट व मिकी पाशेको यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सध्या या तीनही पॅनलचे नेते आपापल्या पॅनलचा जाहीरनामा (काहीजण त्याला वचननामा म्हणतात) तयार करण्यात गुंतलेले आहेत. सदर जाहीरनामे प्रसिद्ध होताच कोण कोण कसली मनमोहक आश्वासने देतो ते कळेल.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या पाठिंब्याने प्रभाग ३० रायबंदर या प्रभागातून महापालिका निवडणुकीत उतरलेले समाजसेवक ऍड. आयरिश रॉड्रिगीज यांनी प्रभाग ३० साठी आपला वेगळा जाहीरनामा जाहीर करणार असल्याची माहिती आज प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. गेल्या अनेक वर्षात पणजीपासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या प्रभाग ३० रायबंदर या भागाला सावत्रपणाचीच वागणूक देण्यात आली असून या पुढे ती कदापि सहन केली जाणार नाही असेहीे ऍड. आयरिश यांनी या पत्रकात म्हटले आहे.
फुर्तादो-मडकईकरांचे बळ प्रभागापुरते
या निवडणुकीत वरील तिन्ही पॅनल व्यतिरिक्त सुरेंद्र फुर्तादो व उदय मडकईकर हे दोन ज्येष्ठ नगरसेवक या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरले आहेत. या पैकी श्री. फुर्तादो यांचा दबदबा त्यांच्या प्रभाग ९ व प्रभाग १० पुरता मर्यादित आहे. तर श्री. मडकईकर यांना विद्यमान सत्ताधारी मंडळातून मंत्री बाबूश यांनी वगळल्याने बाबूश यांना धडा शिकवण्याच्या इराद्यानेच ते निवडणुकीत उतरले आहेत. त्यांचा दबदबा भाटले येथील त्यांच्या प्रभागाबरोबरच पणजीच्या इतर भागात बराच आहे. त्यामुळे त्यांची भूमिका पणजी विकास आघाडीच्या यश अपयशात महत्त्वाची ठरणार आहे हे निश्चित!
Monday, 21 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment