Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 22 February 2011

पेडणे व सांग्यावर मृत्यूची छाया

• जन्मदरापेक्षा मृत्यूदराचे प्रमाण दुप्पट
पणजी, दि. २१(प्रतिनिधी): राज्यातील पेडणे व सांगे तालुक्यावर मृत्यूची काळी छाया पसरल्याचे भयाण चित्र निर्माण झाले आहे, त्यामुळे राज्य सरकारवर आता याबाबतीत गांभीर्याने विचार करण्याची वेळ ओढवली आहे. राज्यातील अन्य सर्व तालुक्यांत जन्माचे प्रमाण कितीतरी पटीने अधिक असता या दोन तालुक्यांत मात्र मृत्यूचे प्रमाण जन्मप्रमाणापेक्षा कमालीचे वाढल्याचे राज्य नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २००६ ते २००९ या चार वर्षांची आकडेवारी पाहता पेडणेत केवळ ९४९ जन्म नोंदवले गेले तर मृतांची संख्या मात्र २०६२ नोंद झाली आहे. सांगे तालुक्यातही तशीच परिस्थिती असून ८०७ जन्मनोंदणीच्या प्रमाणात १५४६ मृत्यू नोंद झाले आहेत.
फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी गत विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना विचारलेल्या एका तारांकित प्रश्‍नावरील उत्तरातून ही भयानक परिस्थिती उघड झाली आहे. पेडणे व सांगे हे दोन्ही तालुके अजूनही विकासापासून वंचित आहेत. वैद्यकीय सुविधांबाबतही या तालुक्यांची परिस्थिती अजूनही चांगली नाही. त्यात वाढती व्यसनाधीनता व सांगे तालुक्यातील अमर्याद खाण व्यवसायाच्या प्रदूषणाचा विषय या संकटाला कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्षही काढला जात आहे. डिचोली, मुरगांव व काणकोण तालुक्यांतील परिस्थिती सध्या आटोक्यात असली तरी चिंता करण्याजोगीच आहे. या आकडेवारीमुळे या परिस्थितीच्या मुळाशी जाऊन संबंधित तालुक्यांतील वाढत्या मृत्यूप्रमाणाची कारणमीमांसा शोधणे आता सरकारसाठी अनिवार्य ठरले आहे. बार्देश, तिसवाडी, सासष्टी, फोंडा, केपे तालुक्यांतील परिस्थिती मात्र त्यामानाने समाधानकारक आहे.
राज्य नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन खात्याकडून ही आकडेवारी तयार करण्यात आली असली तरी त्याची कोणतीच दखल अद्याप सरकारने घेतली नाही. पेडणे व सांगे तालुक्यांवर ओढवलेल्या या भीषण परिस्थितीवर कुणाचेच लक्ष नसून एकूणच राज्यासाठी ही शरमेची व चिंतनीयबाब ठरली आहे.
२००६ ते २००९ पर्यंत तालुकानिहाय जन्म- मृत्यूची नोंदणी
तालुका- जन्म- मृत्यू
पेडणे- ९४९- २०६२
बार्देश- १६१७८- ६७७२
तिसवाडी- २६९४३- १४२२८
डिचोली- ३८११- २३९६
सत्तरी- २२६६- १४११
मुरगाव- ७७५३- ३२४९
फोंडा- ७७९२- ३५८२
सासष्टी- २२८७६- ९९५७
केपे- ४४७३- १८१०
सांगे- ८०७- १५४६
काणकोण- १८२७- १२०७
-----------------
एकूण- ९५६७५- ४८२२०
----------------------------
२०१० (सप्टेंबरपर्यंत)ची आकडेवारी
तालुका - जन्म- मृत्यू
पेडणे- ११५- ३६४
बार्देश- ८०८- ८७१
तिसवाडी- ४८१६- २७१९
डिचोली- ५८३- ४१३
सत्तरी- ३६६- २६६
मुरगाव- १३८१- ६००
फोंडा- १३०१- ७०४
सासष्टी- ४१९२- १८७२
केपे- ७१२- ३७६
सांगे- १४०- २८३
काणकोण- ३१०- २०४
-----------------
एकूण- १४७२४- ८६७२

No comments: