कुंकळ्ळीकरीणीच्या सान्निध्यात सुरू
मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई व गोव्याचे कला व संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जनसेवा मंडळ केपे आयोजित सावरकर साहित्य संमेलन उद्यापासून सुरू होत आहे. सदर संमेलन २४ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या दशकपूर्ती वर्धापनदिनानिमित्त फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण साहित्य नगरीतील खंडराय सभागृहात सुरू होत आहे.
सकाळी ९-३० वा. ग्रंथदिंडी निघेल व १०-३० वा. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते संमेलनाचे होईल. संमेलनाचे अध्यक्ष तथा मुंबईतील सव्यसाची पत्रकार अरविंद कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती राहील. नंतर मुंबईतील खासदार तथा पत्रकार भरतकुमार राऊत यांचे हिंदू राष्ट्रवाद व अल्पसंख्याकांची मानसिकता या विषयावर व्याख्यान होईल.
दुपारच्या सत्रांत डॉ. अशोक मणगुतकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. दिलीप बेतकीकर यांचे ‘सावरकरांचा राष्ट्रवाद व गोमंतकीय ’या विषयावर तर नंतर ‘गोमंतकांतील मराठीची सद्यःस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर प्रा. अनिल सामंत यांची व्याख्याने होतील.
सायंकाळी ४ वा. लोकनृत्यस्पर्धा व नंतर ७ वा. सावरकर विषयक गीतांचा कार्यक्रम बिंदिया वस्तू व सहकारी सादर करतील.
रविवारी २७ रोजी सकाळी ९-३० वा. विद्यार्थ्यासाठी प्राथमिक गटात वेशभूषा तर माध्यमिक गटात देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा घेतल्या जातील. ११-३० वा. शंकर दत्तात्रेय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली गिरीश प्रभुणे यांचे ‘सामाजिक समरसता व सावरकर’ या विषयावर तर नंतर प्रभाकर अनंत संत यांच्या अध्यक्षतेखाली गिरीश दाबके हे ‘सावरकर विचारांपुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्याने होतील.
दुपारी २-३० वा. मुंबईतील हौशी महिला कलाकार मंचातर्फे ‘अग्निकुंड’ हा सावरकरांच्या जीवनावरील सांस्कृतिक कार्यक्रम तर ४ वा. ‘झिंजिर झिंजिर सांज’ हे विष्णू सूर्या वाघ यांचे कविता सादरीकरण होईल.
त्यानंतर सायंकाळी ५ वा. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा होईल. संमेलनाच्या जागृतीसाठी बुधवारी संपूर्ण केपे तालुक्यात काढलेल्या जागृती यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणार्या शिक्षकांना शिक्षण खात्याने खास परवानगी देताना त्या दिवसातील त्यांची शाळांतील अनुपस्थिती ही कामावरील हजेरी मानावी असे परिपत्रक जारी केल्यामुळे बरेच शिक्षक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
Saturday, 26 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment