Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 25 February 2011

आणखी एका वित्तीय कंपनीचा गंडा

‘जीई’ कंपनी’ची मध्यस्थी
वकिलांना महागात

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): ‘जीई मनी फायनान्शिअल सव्हिर्र्सेस लि’ या खाजगी वित्तीय कंपनीच्यावतीने आपल्या थकबाकीदारांना कर्जासंबंधी समेट घडवून आणण्यासाठी ऍड. रविराज चोडणकर यांच्या कार्यालयात आज बोलावले असता उपस्थित लोकांनी कंपनीच्या खोटारडेपणाचे पाढेच वाचून दाखवले. त्यामुळे ऍड. चोडणकर यांनाच भंडावून सोडण्याचा प्रकार इथे घडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ‘जीई मनी फायनान्शिअल सर्व्हिसेस लि’ या दिल्लीस्थीत एका खाजगी वित्तीय गुंतवणूक व पतसंस्थेने (ज्या कंपनीची गोव्यातील सर्व कार्यालये सध्या बंद करण्यात आली आहेत) १० वर्षापूर्वी गोमंतकीयांना मोठ्या प्रमाणात ‘विना जामीन’ विविध वस्तू खरेदी करण्यासाठी सहजपणे कर्जे उपलब्ध करून दिली. कंपनीच्या या भूलभुलैयेला बळी पडत अनेकांनी विना जामीन १० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंतची कर्जे घेत फ्रिज, टीव्ही, दुचाकी आदी वस्तू खरेदी केल्या. विविध वस्तूंच्या शोरूममध्येही या कंपनीचे प्रतिनिधी कर्ज देण्यासाठी बसले होते. दरम्यान, या कर्जाच्या वसुलीसाठी तेवढ्याच रकमेचे धनादेश कंपनीकडून घेण्यात आले होते. बहुतांश ग्राहकांच्या बँक खात्यातून हे सर्व धनादेश वठले असताना सुमारे ४०० लोकांना अचानक नोटिसा पाठवून थकबाकी वसुलीसाठी ऍड. चोडणकर यांच्याशी समेटासाठी बोलावण्याचा प्रकार घडल्याने हे ग्राहक बरेच संतापले आहेत. या नोटिसा ‘लिगम असोसिएट्स’ नामक कंपनीतर्फे ऍड. राजीव नारायणन् यांच्या नावे पाठवण्यात आल्याचे आढळून आले. या कंपनीचे मुख्य कार्यालय पणजीत ‘आयसीआयसीआय’ बँकेमागे होते परंतु गेले काही महिने झाले ते बंद करण्यात आले आहे. आता या कंपनीचे एकही कार्यालय गोव्यात नसून या कंपनीतर्फे एका वेगळ्याच कंपनीला वसुलीचे कंत्राट दिल्याची खबर आहे.
आज या नोटिसा मिळालेल्या सुमारे १२० जणांच्या जमावाने ऍड. चोडणकर यांच्या कार्यालयावर धडक दिली. ऍड. चोडणकर हे कार्यालयात अनुपस्थित होते परंतु सदर कंपनीचा प्रतिनिधी महादेव अनचाटे व ऍड. चोडणकर यांच्या साहाय्यकांवर ग्राहकांनी प्रश्‍नांचा भडिमार सुरू केला. कर्जाच्या वसुलीसाठी दिलेले सर्व धनादेश वठले असताना १० हजारांच्या कर्जावर २ लाख रुपये भरण्याची नोटीस पाठवलीच कशी? असा सवाल करून काहींनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी ग्राहकांनी ऍड. चोडणकर यांना बोलावून घेतले. ऍड. चोडणकर यांच्याकडे समेटासाठी चर्चा करण्याची जबाबदारी वसुली करणार्‍या कंपनीकडून दिली गेली असली तरी मूळ कंपनीबाबत ऍड. चोडणकर यांना कोणतीच माहिती नसल्याचे यावेळी दिसून आले. सदर वित्त कंपनीचे कार्यालय पणजीत आहे असे म्हणणार्‍या ऍड. चोडणकर यांचा दावा कंपनीचे प्रतिनिधी श्री. अनचाटे यांनी खोडून टाकल्याने बराच गोंधळ उडाला. या कंपनीशी झालेल्या व्यवहारांबाबत कोणती कागदपत्रे आहेत, असा प्रश्‍न केला असता यावेळी ऍड. चोडणकर मात्र अनुत्तरित बनले.
कर्ज न काढताच थकबाकीच्या नोटिसा
या बाबत चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे ज्या सुमारे ४०० लोकांना लाखो रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे त्यात अनेकांनी कर्जेच काढलेली नसल्याचे दिसून आले आहे. कर्ज न काढता मिळालेल्या या नोटिशीमुळे हे लोक बरेच आक्रमक बनले होते. याठिकाणी एका इसमाने कंपनीकडून ३० हजार रुपयांचे कर्ज घेऊन प्रत्येकी १८०० याप्रमाणे ३० धनादेश दिले होते. ही सगळी रक्कम फेडली असताना आता त्यांना आणखी ५० हजार रुपये भरण्याची नोटीस दिली आहे. ही नोटीस मिळालेल्या ग्राहकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.
वकिलांच्या भूमिकेवर संशय
यावेळी लोकांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून टाकण्यासाठी धडपड करणारे ऍड. चोडणकर यांच्या भूमिकेवरच उपस्थित ग्राहकांनी संशय व्यक्त केला आहे. कंपनीच्या कर्जांसंबंधी समेट घडवून आणण्याचा अधिकार ऍड. चोडणकर यांना कुणी दिला व त्यासंबंधीचे पत्र दाखवा असा हट्ट धरला असता ते अनुत्तरित ठरले. दरम्यान, ऍड. चोडणकर यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला असता त्यांनी यासंबंधी पंधरा दिवसांत खुलासा करावा व सर्वांना एकत्रितपणे बोलवावे, असे लिहून घेण्यात आले. अन्यथा याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्याचा इशाराही या लोकांनी दिला आहे.

No comments: