Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 23 February 2011

पणजी जेटीवर दातांनी ओढल्या बोटी

• कृष्ण श्रीवास्तव व बबीता मिश्रा यांची करामत
• ‘गिनीज बुक’मध्ये नोंद होणार

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): ‘हनुमनजीकी कृपा’ म्हणत पणजी जेटीवर मध्यप्रदेश येथील गेली अनेक पराक्रम करणारे पहेलवान कृष्ण श्रीवास्तव व पेशाने शिक्षिका असलेल्या बबिता मिश्रा यांनी आज (दि.२२) दातांनी दोन बोटी ओढून या पूर्वीचे आपलेच विक्रम तोडले व विश्वविक्रम करून लिम्का रेकॉर्ड बुक व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या जागतिक विक्रमांच्या पुस्तकात आपली नावे नोंद केली.
पणजी जेटीवर आयोजित केलेल्या या रोमांचकारी कार्यक्रमात प्रथम कृष्ण गोपाळ श्रीवास्तव यांनी ५१० टनाची ‘प्रिन्सेस दी गोवा’ ही बोट साडेचार मीटरपर्यंत ओढली. त्यांनी या पूर्वी आपणच केलेला ३५० टनाची बोट ओढण्याचा विक्रम मोडला. तर पेशाने शिक्षिका असलेल्या श्रीमती मिश्रा यांनी १३० टन वजनाची ‘रॉयल क्रुझ’ ही बोट चार मीटरपर्यंत ओढली. यापूर्वी त्यांनी भरलेला ट्रक ओढण्याचा पराक्रम केला होता. यावेळी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या संचालिका डॉ. सुझान डिसोजा, माजी मंत्री निर्मला सावंत व इतर बरेच मान्यवर उपस्थित होते. डॉ. डिसोझा यांनी श्री. श्रीवास्तव व श्रीमती मिश्रा यांचा चषक व भेटवस्तू देऊन गौरव केला.
हा विक्रम केल्यानंतर बोलताना श्री. श्रीवास्तव यांनी सांगितले की, गोवा सरकार व मध्यप्रदेश सरकारमार्फत हा विक्रम गिनीज बुक ऑफ बर्ल्ड रीकार्ड समितीकडे जाणार आहे. यापूर्वी उभे असलेले बोइंग विमान दाताने ओढलेले श्रीवास्तव यांनी पुढील काळात गोव्यातच चालते हेलिकॉप्टर व चालती रेल्वे दाताने रोखण्याची व कोचीन ते कोलंबो असा प्रवास करणारे ६००० टनाचे जहाज दाताने ओढण्याची मनीषा व्यक्त केली. तर श्रीमती मिश्रा यांनी जगात स्त्रीने दाताने बोट ओढण्याचे काम कधीच केलेले नाही. आपण त्याला अपवाद असल्याचे सांगून यापेक्षा जास्त मोठे पराक्रम करण्याचे ध्येय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

No comments: