Saturday, 26 February 2011
लोकांच्या जिवाशी खेळ नको
‘पीएसी’ बैठकीत अधिकार्यांना खडसावले
खनिज वाहतूकीविरोधातील कारवाईवर
नजर ठेवण्यासाठी उपसमिती स्थापन
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
राज्यातील बेकायदा खाणींमुळे खनिज वाहतुकीवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. सांगे, कुडचडे, सावर्डे आदी भागांत स्थानिक लोकांचे जगणेच हैराण बनले आहे. या परिस्थितीत सरकारी यंत्रणेकडून कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे बनले आहे. लोकांच्या जिवाशी खेळ मांडू नका, अन्यथा त्याचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा देत लोकलेखा समितीने खाण, वाहतूक, पोलिस व जिल्हाधिकारी अधिकार्यांना चांगलेच खडसावले आहे.
आज लोकलेखा समितीची (पीएसी) बैठक विधानसभा संकुलात झाली. या बैठकीला खाण, वाहतूक, पोलिस खात्याचे अधिकारी तसेच दोन्ही जिल्हाधिकार्यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी विविध भागात बेफाम खनिज वाहतुकीविरोधात जनतेच्या उठावाचा विषय चर्चेस घेण्यात आला. खनिज वाहतुकीचा ताण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की येथील स्थानिक लोकांना श्वास घेणेही कठीण बनले आहे. रस्त्याची रुंदी व त्यात ट्रकांची वाढती संख्या लक्षात घेता परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक बनले आहे. खाण तथा वाहतूक कायद्यात अनेक तरतुदी असून त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून या परिस्थितीवर काबू ठेवणे गरजेचे आहे व त्यासाठी जिल्हाधिकारी तसेच पोलिसांची मदत घेता येईल, अशी सूचना समितीकडून करण्यात आली. २००३-०५ या काळातील महालेखापाल अहवालात सुमारे एक कोटी टन खनिजावरील रॉयल्टीचा हिशेब मिळाला नसल्याची नोंद झाली होती व त्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुळातच खाण खात्याला कायदेशीर खाणींवर नियमन घालणे शक्य झालेले नाही व त्यामुळेच बेकायदा खाणींचा उद्रेक सुरू आहे. राज्यातील कायदेशीर खाणींची ओळख पटवल्यानंतरच बेकायदा खाणी आपोआपच उघड होतील, असा सल्लाही समितीचे अध्यक्ष मनोहर पर्रीकर यांनी दिला. खाण कायद्यात आवश्यक तरतुदी असून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्याची गरज आहे. बहुतांश ट्रक चालकांकडे वाहन चालक परवाना नसल्याचे आढळून आले आहे. विविध खाण प्रभावित भागांत हे ट्रक यमदूत बनूनच धावतात व त्यामुळे पहिल्यांदा विनापरवाना चालकांवर कारवाई होण्याची गरज आहे. काही ठिकाणी दिवसाकाठी १५ हजार ट्रक धावतात, असे आढळून आले आहे. दरम्यान, सुरुवातीला काही निवडक भागांत खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची पद्धत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात सांगे, रेवण, किर्लपाल आदी भागांचा समावेश आहे. यासंबंधी सुरू होणार्या कार्यपद्धतीवर नजर ठेवण्यासाठी फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती नेमण्याचाही निर्णय झाला आहे. खनिज वाहतुकीचा हा विषय हाताळण्यासाठी विशेष पोलिस उपअधीक्षकांची नेमणूक करण्याचीही शिफारस समितीने केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment