एक बेपत्ता, ६ जणांना वाचवले
पणजी, दि.२१(प्रतिनिधी): वास्को येथील ‘एम. व्ही. नूर ४’ ही खनिजवाहू बार्ज काल २० रोजी रात्री आग्वाद सिकेरी येथील समुद्रात बुडाल्याची घटना घडली. या बार्जमधील एक खलाशी कामगार बेपत्ता असून इतर सहा ६ खलाशांना इतर बार्जवरील खलाशांनी वाचवण्यात यश मिळवले.
बंदर कप्तान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही खनिजवाहू बार्ज समुद्रातील जहाजावर माल उतरवत असताना ही घटना घडली. गौरंगा मोडांल(२४) हा खलाशी अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. या बुडालेल्या बार्जमुळे समुद्रात वाहतूक करणार्या सर्व प्रकारच्या जहाजांना व बार्ज मालकांना बंदर कप्तान खात्याकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून कोणताही अडथळा निर्माण झाला किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ खात्याला कल्पना देण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, ही घटना घडली तेव्हा ताबडतोब इतर बार्जवरील खलाशांनी या बुडत्या बार्जवरील खलाशांना मदतीचा हात दिला. त्यात गौरंगा हा आधीच पाण्यात पडल्याने त्याचा पत्ता लागू शकला नाही. या घटनेची माहिती मिळताच बंदर कप्तान व नौदलाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता गौरंगाचा पत्ता लागू शकला नसल्याचे सांगण्यात आले.
वेळसांव येथे मृतदेह आढळला
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वेळसांव येथे किनार्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळण्याची माहिती मिळाली आहे. हा मृतदेह बार्ज अपघातात बेपत्ता झालेल्या गौरंगाचा आहे काय, याची शहानिशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Tuesday, 22 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment