दोन उमेदवार अपात्र
२६ रोजी चिन्हांचे वाटप
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेसाठी दि. १३ मार्च रोजी होणार्या ३० प्रभागासाठीच्या निवडणुकीसाठी एकूण १५४ उमेदवारांनी २७२ उमेदवारी अर्ज भरले होते. आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत त्यातील दोन उमेदवार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आज उमेदवारी अर्जांची छाननी संपल्यानंतर आता १५२ उमेदवारांचे अर्ज ग्राह्य झाले आहेत. दि. २५ हा अर्ज मागे घेण्याचा दिवस असून निवडणुकीच्या रिंगणात नक्की किती उमेदवार राहणार आहेत ते दि. २५ रोजीच स्पष्ट होणार आहे. मात्र प्रभाग २२ मध्ये दोनच उमेदवार असल्याने तेथे दुरंगी लढतीची शक्यता आहे.
आज निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली
पणजी महापालिकेच्या दि. १३ मार्च रोजी होणार्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यातील प्रभाग २२ मधील श्रीमती दुर्गा च्यारी यांचा अर्ज त्या आपल्या अर्जासोबत ‘इतर मागासवर्गीय’ म्हणून दाखला लावू शकल्या नाहीत म्हणून फेटाळण्यात आला. कारण प्रभाग २२ हा इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या प्रभागात आता माया तळकर व हेमा चोपडेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. तर प्रभाग २८ मधील अश्विनी नाईक चोपडेकर यांचा अर्ज फेटाळण्यात आला. या निवडणुकीसाठी उमेदवाराला २१ वर्षे पूर्ण होण्याची गरज आहे. अश्विनी नाईक यांना २१ वे वर्षे सुरू आहे. या प्रभागात आता तीन उमेदवार रिंगणात मागे राहिले आहेत.
शुक्रवार दि. २५ हा दिवस अर्ज मागे घेण्याचा असून १५२ पैकी अनेक उमेदवार आपले अर्ज या दिवशी मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीचे नक्की चित्र दि. २५ रोजीच स्पष्ट होणार आहे. दि. २६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून कांपाल येथील बालभवनमध्ये निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीत भाजप समर्थक पणजी फर्स्ट, कॉंग्रेस समर्थक पणजी महापालिका विकास आघाडी व राष्ट्रवादी पक्ष समर्थक टुगेदर फॉर पणजी ही तीन पॅनल्स व इतर अनेक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
आज अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर विविध प्रभागात ग्राह्य झालेले अर्ज पुढीलप्रमाणे- (प्रभाग १) ४, (२) ८, (३) ६, (४) ४, (५) ३, (६) ५, (७) ४, (८) ६, (९) ५, (१०) ५, (११) ५, (१२) ४, (१३) ५, (१४) ६, (१५) ३, (१६) ५, (१७) ५, (१८) ८, (१९) ६, (२०) ७, (२१) ५, (२२) २, (२३) ६, (२४) ६, (२५) ४, (२६) ६, (२७) ५, (२८) ३, (२९) ५ व (३०) ६.
Wednesday, 23 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment