Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 20 February 2011

नवजात अर्भकाचा गळा आवळून खून

(म्हापशातील घटना)
म्हापसा, दि. १९ (प्रतिनिधी)
नवजात अर्भकाचा नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्याची घटना आज म्हापशात उघड झाली. येथील बाजारात एका कचर्‍याच्या टोपलीत प्लॅस्टिक पिशवीमध्ये हे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. काळीज पिळवटून टाकणारी ही संतापजनक घटना काल शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास उघड झाली.
याबाबत म्हापसा पोलिस निरीक्षक राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोजप्रमाणे काल रात्रीही ९ च्या सुमारास म्हापसा मार्केटमधील सर्व व्यवहार बंद झाले. त्यानंतर ११ वा. रोज पदपथावर झोपणारी एक फुलविक्रेती महिला बाजारात भाजीविक्रेत्यांनी टाकलेल्या भाजीच्या कचर्‍यामधील चांगले टोमॅटो वेचून काढीत असता तिला एका टोपलीत प्लॅस्टिक पिशवी मिळाली. तिने उत्सुकतेने ती उघडली असता त्यामध्ये ओढणीत गुंडाळलेल्या अवस्थेतील नवजात अर्भक तिच्या नजरेस पडले. तात्काळ तिने गस्तीवर असलेल्या हवालदार दयानंद साळगावकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी पोलिस निरीक्षक राजेश कुमार व उपअधीक्षक सॅमी तावारीस यांना कळविले. या दोघांनी पोलिस पथकासमवेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अर्भकाच्या गुप्त भागाकडील नाळ कापण्यात आली नव्हती. त्यामुळे ते अर्भक काल शुक्रवारी १८ रोजी सकाळी जन्माला आले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. अर्भक जिवंत आहे का, याचा तपास केला असता नायलॉन दोरीच्या साहाय्याने अर्भकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा करून श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. श्‍वानपथक घटनास्थळावरून ५० मीटर अंतरावरील मुख्य रस्त्यावर जाऊन घुटमळत राहिले. म्हापसा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंसं कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास निरीक्षक राजेश कुमार करीत आहेत.

No comments: