साळगावकर कॉलेज विद्यार्थी मंडळाकडून
रॉयल कॅसिनोची जोरदार जाहिरातबाजी
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाने कला अकादमीत ‘तत्त्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे दोन दिवस आयोजन केले असून हा कार्यक्रम रॉयल कॅसिनोने पुरस्कृत केला आहे. काल (दि.२३) व आज (दि.२४) असे दोन दिवस हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी - विद्यार्थिनींनी रॉयल कॅसिनोची ‘टी शर्ट’ परिधान करून कॅसिनोची जाहिरात करत आहेत. त्यामुळे आजची तरुण पिढी नक्की कोणत्या दिशेने जात आहे याचा प्रत्ययच त्यामुळे आला आहे. गोमंतकीय देशप्रेमी नागरिकांनी या प्रकारावर कडक ताशेरे ओढत हा प्रकार म्हणजे येथील गोमंतकीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.
कॅसिनोला गोमंतकातील सुजाण नागरिकांकडून जोरदार विरोध होत असताना सरकारच्या आशीर्वादाने या कॅसिनोच्या बोटींनी मांडवीत आपले बस्तान मांडून मांडवीच्या सौंदर्यावर काळा डाग लावलेला आहे. शिवाय त्याचसोबत गोव्यात येणारे पर्यटक आणि गोमंकीयांना अधोगतीकडे नेण्याचे कामही करत आहेत.
कालांतराने लोकांना वस्तुस्थितीची जाणीव होऊन यदाकदाचित कॅसिनोंचा बाजार बंद करावा लागेल म्हणूनच आपली पाळे गोमंतक भूमीत घट्ट करण्याचा प्रयत्न कॅसिनोकडून होत आहे. त्यातीलच हा प्रकार आहे. त्यासाठी कॅसिनो पुरस्कृत गजलसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांना भरपूर आर्थिक मदत करणे असे उपाय योजले जात आहेत. परंतु पैसे घेणार्या विद्यार्थ्यांना किंवा त्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनाही कॅसिनोच्या बाबतीत जाण नाही काय? असा प्रश्न सदर नागरिकांनी उपस्थित केला आहे. आज जागे नाही झालो तर उद्या रडण्याची वेळ येईल कारण उद्याच्या वाईट दिवसांचे आज मिळणारे हे संकेत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे चांगली गोष्ट असली तरी त्या कार्यक्रमातून समाजाला चांगला संदेश जातील याचे भान नको का? कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे अजाण तर नक्कीच नाहीत मग त्यांनी अशी दुर्बुद्धी का सुचावी याचा विचार होणे आवश्यक आहे.
Friday, 25 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment