Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 21 February 2011

३ लाखांचे संगणक जप्त

• पणजी पोलिसांची कारवाई
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): सांताक्रुज येथील संगणक विक्री दुकानातून लॅपटॉप आणि अन्य वस्तू घेऊन पोबारा केलेल्या चोरट्याकडून पणजी पोलिसांनी ३ लाख रुपयांचे संगणक जप्त केले. कर्नाटक येथील सागर येथे गेलेल्या पणजी पोलिसांच्या पथकाने त्याच्या राहत्या घरातून हा ऐवज जप्त केला. ईस्माईल कासीम कुंजी मोहमद (२३)याला या प्रकरणी अटक झाली असून त्याला पोलिस कोठडीत घेण्यात आले आहे.
अधिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सांताक्रूज येथे संगणक विक्रीचे दुकान असलेल्या हैदर शेख यांनी आपल्या दुकानातून दहा संगणक चोरीला गेल्याची तक्रार केली होती. त्यावरून संशयिताला ताब्यात घेतले होते. सांतिनेज येथे राहणार्‍या ईस्माईल याच्याकडून तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले. तर, अन्य संगणक आणि लॅपटॉप त्यांनी आपण कर्नाटक सागर येथील तीन दुकानात विकल्याचे सांगितले. त्या माहितीवरून पणजी पोलिस स्थानकातील पोलिस उपनिरीक्षक रामनाथ कळंगुटकर यांनी आपल्या पथकासह त्याठिकाणी जाऊन छापा टाकला. सदर दुकानातून संगणक ताब्यात घेतले तसेच, मूळ घरी ठेवण्यात आलेलेही संगणक जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही महिन्यापासून ईस्माईल याने आपण नोकरी करत असलेल्या दुकानातून संगणकाची आणि लॅपटॉपची चोरी करण्याचे सत्र सुरू केले होते. आर्थिक वर्ष अखेरीस दुकानातील सर्व संगणकांची चाचपणी करण्यात आली तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या कारवाईत पोलिस निरीक्षक रमेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री. कळंगुटकर यांच्यासह पोलिस हवालदार डी. के. नाईक, उल्हास खोत, श्रीराम साळगावकर, नितेश हळर्णकर, विजय पाळणी व गिरीश राऊळ यांनी सहभाग घेतला. याविषयीचा अधिक तपास श्री. कळंगुटकर करीत आहेत.

No comments: