कर्मचारी संघटनेचा इशारा
पणजी,दि.२०(प्रतिनिधी): कदंबच्या चालक व वाहकांवर कारवाई करून महामंडळातील भ्रष्टाचार निपटून काढण्याचा आभास सध्या व्यवस्थापनाकडून निर्माण केला जात आहे. कदंब परिवहन महामंडळ डबघाईस येण्यास येथील बडी धेंडेच जबाबदार आहेत व जोपर्यंत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही तोपर्यंत महामंडळ साफ होणार नाही, अशी प्रतिक्रिया कदंब चालक व इतर सहकर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्योकीम फर्नांडिस यांनी दिली.
कदंब परिवहन महामंडळाचे अध्यक्ष मगोचे आमदार दीपक ढवळीकर यांनी ताबा घेतल्यानंतर महामंडळाच्या साफसफाईचे काम हाती घेतल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महामंडळातील गैरकारभारांवर कडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. राज्यांतर्गत व आंतरराज्य मार्गांवरील कदंब महामंडळाच्या बसगाड्यांवरील वाहकांकडून होणाऱ्या गैरकारभारांची तपासणी सुरू झाली आहे. आपल्या सेवेशी अप्रामाणिक असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज आहेच परंतु ही कारवाई नियम व कायद्याला धरून व्हावी. एखाद्याकडून गैरकारभार झाला तर त्याची योग्य पद्धतीने चौकशी करून नंतरच कारवाई करण्यात यावी,असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कदंब महामंडळातील बड्या धेंड्यांना मोकळे सोडून केवळ चालक व वाहकांनाच लक्ष्य बनवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. व्यवस्थापनांत अनेक झारीतील शुक्राचार्य आहेत व त्यांचा पर्दाफाश होण्याचीही तेवढीच गरज आहे. महामंडळाच्या खरेदी विभागाकडून मोठ्या प्रमाणात बनावट मालाची खरेदी केली जाते हे सर्वपरिचित आहे. पण याबाबत कुणीच कारवाई करीत नसल्याने या घोटाळ्यांत सगळेच सामील आहेत की काय,अशी शक्यता निर्माण झाली आहे. कदंब गाड्या कंत्राटावर देण्याच्या व्यवहारांचीही चौकशी व्हावी,अशी मागणीही यावेळी फर्नांडिस यांनी केली. महामंडळ कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला असला तरी अद्याप योग्य पद्धतीने वेतनश्रेणी लागू न केल्याने कर्मचाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत व्यवस्थापनाचा वाटाही योग्य पद्धतीने जमा केला जात नाही. महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण पुढे केले जात असले तरी हा कर्मचाऱ्यांवरील अन्याय असल्याचा आरोप यावेळी फर्नांडिस यांनी केला. चालक तथा वाहकांना एक दिवसाच्या आजारी रजेसाठीही वैद्यकीय दाखला आणण्याची सक्ती केली जात आहे. या प्रकारामुळेच गैरहजेरीचे प्रमाण वाढले असून एक दिवसासाठी वैद्यकीय दाखला आणावा लागत असेल तर त्यापेक्षा तीन दिवस घरी राहणेच कर्मचारी पसंत करतात,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महामंडळाच्या अधिकारिवर्गांची लॉबीच बनली असून आपल्या मर्जीतील अध्यक्षांची निवड झाली की तिथे ठरावीक अधिकाऱ्यांची घोळका त्यांच्यामागे असतो व आपापल्या बढत्या व इतर कामे करून घेतली जातात,अशी टिकाही यावेळी करण्यात आली. महामंडळाची आर्थिक परिस्थितीत बेताची असल्याने माजी व्यवस्थापकीय संचालक अमरसिंग राणे यांनी अधिकाऱ्यांची वाहने काढून घेतली होती. अमरसिंग राणे यांच्या बदलीनंतर आता ही वाहने पुन्हा या अधिकाऱ्यांना बहाल करण्यात आली. महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न हवेत, असेही यावेळी ज्योकीम फर्नांडिस यांनी सांगितले.
झाडूवाल्यांचा संप मागे
कदंब महामंडळाअंतर्गत विविध बसस्थानकांवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना अखेर कंत्राटदाराने किमान वेतन देण्याचे मान्य केल्याने त्यांनी काल १९ पासून सुरू केलेला संप मागे घेण्यात आल्याची माहितीही यावेळी श्री.फर्नांडिस यांनी यावेळी दिली.
Saturday, 21 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment