भाविकांचा महापूर, नामवंतांच्या मैफली
वास्को, दि. १४ (प्रतिनिधी): वास्को शहरात यंदा साजऱ्या होणाऱ्या ११२ व्या श्री दामोदर भजनी सप्ताहासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याकरिता वास्कोवासीय सज्ज झाले आहेत. उद्या १५ तारखेला दुपारी १२.३० वाजता उद्योजक परेश जोशी यांच्याकडून देव दामोदरासमोर श्रीफळ अपर्ण केल्यानंतर अखंड २४ तासाच्या भजनी सप्ताहाला सुरुवात होणार आहे.
सप्ताहादरम्यान वास्कोतील स्वतंत्र पथ मार्गावर तसेच इतर ठिकाणी लावण्यात येणारी फेरीतील दुकानेही सजली आहेत. त्यांची संख्या सुमारे सातशे आहे. ही माहिती नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी दिली. सप्ताहादरम्यान शहर पूर्ण स्वच्छ रहावे याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
या प्रसिद्ध सप्ताहाला गोव्याबरोबरच गोव्याबाहेरून येणाऱ्या भक्तगणांना कुठल्याच प्रकारचा त्रास न व्हावा यासाठी पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे असे वास्को दामोदर भजनी सप्ताह समितीचे अध्यक्ष प्रताप राणे यांनी सांगितले.
सप्ताहादरम्यान वास्कोतील वेगवेगळ्या ठिकाणी सहा समाजाकडून आयोजिण्यात आलेल्या गायनाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारण्यात आले असून प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर तसेच इतर नामवंत गायकांच्या मैफली याप्रसंगी वास्कोत रंगणार आहेत.
हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वास्को पोलिसांनी पूर्ण सज्जता ठेवल्याचे उपअधीक्षक महेश गावकर यांनी सांगितले. सप्ताहाच्यादरम्यान एकूण ३०० पोलिस विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. यात २७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २५० पोलिस दक्षिण गोव्यातून मागवण्यात आले आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी विविध ठिकाणी आठ टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
देव दामोदराच्या मंदिरासमोर पोलिस बूथ उभारण्यात आला आहे. तेथे कोणालाही संपर्क साधण्याची मुभा देण्यात आली आहे.
सप्ताहाच्यादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी १२८ वाहतूक पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. वास्कोच्या सेंट अँन्ड्रु चर्चसमोरून सप्ताहादरम्यान स्वतंत्र पथ मार्ग बंद (इंडियन ऑयल जंक्शन पर्यंत) करण्यात आला आहे. या काळात (दि १५ ते २४ पर्यंत) एफ.एल.गोम्स मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे.
Sunday, 15 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment