बक्षीस वितरण सोहळ्यात पर्रीकर यांचे प्रतिपादन
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)- वृत्तपत्रांनी निव्वळ बातमीदारी न करता लोकांपर्यंत पोहोचणे ही आता काळाची गरज बनली आहे. त्यासाठी लोकांना लिहिते केले पाहिजे. "नागरिक बातमीदार' या अनोख्या स्पर्धेद्वारे "गोवादूत'ने नेमका याच गोष्टीवर प्रकाश टाकला आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे केले.
"गोवादूत'तर्फे आयोजित "नागरिक बातमीदार' स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. "गोवादूत'च्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, ख्यातनाम साहित्यिक तथा गोवा सरकारचे वृत्तपत्र सल्लागार विष्णू सुर्या वाघ, "गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट'चे ("गूज') अध्यक्ष प्रकाश कामत, "गोवादूत'चे संपादक राजेंद्र देसाई, कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे, सहसंपादक सुनील डोळे, कार्मिक व्यवस्थापक विलास कामत, इतिहास अभ्यासक डॉ. प्रमोद पाठक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. पर्रीकर म्हणाले, अलीकडे मराठी वाचणाऱ्यांची संख्याच घटत चालली आहे. इंग्रजीचे स्तोम वाढत चालले आहे. शिवाय इंटरनेटसारख्या सुविधा हाताशी उपलब्ध झाल्यामुळे पूर्वीसारखे वाचन केले जात नाही. गोव्यातील राजकीय परिस्थितीबद्दल सांगायचे तर जी मागणी विरोधकांनी सभागृहात सातत्याने लावून धरली होती त्यावर मंत्री सभागृहाबाहेर स्वतःची भूमिका मांडतात याला काय म्हणावे? अनेकदा अधिवेशन सुरू असतानाच एखादी मोठी घटना घडली तर तो मुद्दा विधानसभेत का मांडला नाही, असा प्रश्न लोक आपणास विचारतात. वस्तुस्थिती अशी आहे की, सभागृहात मांडायचे सर्व प्रश्न एक महिना आधी विधानसभा सचिवालयाला सादर करावे लागतात. नंतरच त्यावर चर्चा केली जाते. त्यामुळे कितीही तीव्र इच्छा असली तरी तो मुद्दा त्वरेने मांडता येत नाही. अनेकांना ही बाब माहीत नसते. साहजिकच संबंधित मंडळी आमच्याकडेही संशयाने पाहतात. सभागृहाच्या नियमांत राहूनच आम्हाला जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागते.
श्री. वाघ म्हणाले, समस्त गोमंतकियांचे जिव्हाळ्याचे प्रश्र्न हाताळणाऱ्या "गोवादूत'ने सामान्य नागरिकासाठी "नागरिक बातमीदार' ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करून गोव्यातील पत्रकारितेला सर्वस्वी वेगळे वळण दिले आहे. सरकारच्या जास्तीत जास्त चुका शोधून काढून त्या प्रसिद्ध करणे हीच खरी पत्रकारिता असून याबाबतीत गोवादूत इतर दैनिकांच्या खूपच पुढे आहे. त्यामुळे "गोवादूत' सामान्यांचे प्रश्न मांडणारे गोव्यातील आघाडीचे दैनिक बनले आहे.
दबाव व तणाव सहन करण्याची ताकद ज्या पत्रकारात असते तोच खरा पत्रकार. ग्रामीण भागातील पत्रकारावर तेथील राजकीय व्यक्तींचा मोठा दबाव असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील वार्ताहर वादग्रस्त पण जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या पाठवत नाहीत. पाठवल्या तरी अनेक वर्तमानपत्रे त्या छापत नाहीत. "गोवादूत' मात्र त्याला अपवाद ठरला आहे. ज्या वर्तमानपत्रात विचार आहे ते वर्तमानपत्र चिरंतन टिकते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रकाश कामत यांनी सांगितले, आपल्या देशातील बहुतांश बड्या वर्तमानपत्रांची मालकी उद्योगपतींकडे असल्याने जो तो परस्परांना सांभाळून घेण्यापायी खऱ्या बातमीवर अन्याय करताना दिसतो. जाहिरातींपायी गळेकापू स्पर्धा सुरू असल्याने ग्रामीण भागांतील समस्यांना कोणी वालीच उरलेला नाही. गोवादूतने आयोजित केलेल्या नागरिक बातमीदार स्पर्धेसारख्या उपक्रमांमुळे त्या समस्यांना वाचा फुटण्यास मदत होईल. गोव्यातील अन्य वृत्तपत्रांच्या तुलनेत "गोवादूत' अशा समस्यांना प्रसिद्धी देण्यात आघाडीवर आहे.
राजेंद्र देसाई यांनी स्वागत आणि प्रास्तविक करताना सांगितले की, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांच्यावरील अन्यायांना वाचा फोडणे हे व्रतच गोवादूतने अंगिकारले आहे. त्यावर विचार करताना "गोवादूत'चे मुख्य प्रतिनिधी किशोर नाईक गावकर यांना "नागरिक बातमीदार' स्पर्धेची कल्पना सुचवली आणि आम्ही ती प्रत्यक्षात उतरवली. या स्पर्धेला गोव्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र वाचकांनी केवळ एवढ्यावरच समाधान न मानता आणखी जोमाने लिहित राहणे गरजेचे आहे.
श्री. पर्रीकर, श्री .वाघ व प्रकाश कामत यांच्या हस्ते पुढील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. राज्य विजेते श्रीकृष्ण धोंड (डिचोली), तालुकास्तरीय - संचित म्हाऊसकर ( सत्तरी), स्वप्निल गावकर (सांगे), गुरूनाथ फातर्पेकर (केपे), अरुण कामत (बार्देश), सतीश जुटेकर (सासष्टी), प्रगती चणेकर (पेडणे), व महेश पारकर (फोंडा). उत्तेजनार्थ - सुतेज साकोर्डेकर , रमेश किनळकर , पद्माकर चणेकर, सुनिता गावडे ,विनय गावकर व अक्षय नाईक.
स्पर्धेचे परीक्षण विष्णू वाघ, प्रकाश कामत व प्रा. राजेंद्र केरकर यांनी केले. स्पर्धकांच्या वतीने श्रीकृष्ण धोंड , संचित म्हाऊसकर, गुरूनाथ फातर्फेकर, अरुण कामत, महेश पारकर , पद्माकर चणेकर व विनय गावकर यांनी मनोगत व्यक्त केले. गंगाराम म्हांबरे यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली . सूत्रनिवेदन सीताराम नाईक यांनी केले. सुनील डोळे यांनी आभार मानले.
Monday, 16 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment