Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 15 August 2010

दहशतवादाचे निर्दालन करूया

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली, दि. १४ : वेगाने फोफावत चाललेल्या दहशतवादाने केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक शांततेला फार मोठा धोका निर्माण केला आहे. ही विषवल्ली वेळीच ठेचून काढण्यासाठी देशवासीयांनी कमालीची एकजूट दाखवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी देशाच्या ६४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना केले.
त्या म्हणाल्या, देशाच्या कोणत्याही भागातून दहशतवादी आणि दहशतवादी कृत्यांना कसलाच पाठिंबा मिळता कामा नये. त्यादृष्टीने आपण सर्वांनीच दक्ष राहायला हवे. कारण मानवाची, समाजाची एकत्रित ताकद ही या दहशतवादापेक्षा फार मोठी आहे. तिचा आविष्कार घडवण्याची वेळ आली आहे. जगाला एकत्रित बांधून ठेवायचे असेल तर मानवता हा एकचि धर्म या तत्त्वाचा अवलंब केला पाहिजे. त्यासाठी कुटुंबव्यवस्था हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवाच्या उन्नतीसाठी प्रचंड योगदान देण्याची क्षमता भारतात निश्चितच आहे. त्यातून आपण एक महान राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो.
स्वतंत्र भारतासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला अशा सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करूया. आपल्या इतिहासावर एक नजर टाकूया. कारण इतिहासच आपल्याला भविष्यातील योजना आखण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम करत असतो. देशाला लाभलेल्या संपन्न संस्कृतीचाही आपल्याला विसर पडता कामा नये. हातात हात गुंफून आपण जर धैर्याने विविध आव्हानांचा सामना केला तर एक राष्ट्र म्हणून आपली मान जागतिक पातळीवर सतत उंच राहिल, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

No comments: