Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 19 August 2010

गाडगीळ आत्महत्या प्रकरण रसिका शेट्ये हिला वाळपई येथे अटक

वाळपई, दि. १८ (प्रतिनिधी): वाळपईचे पोस्टमास्तर प्रकाश रामचंद्र गाडगीळ यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपावरून, नाणूस येथील रशिगंधा उर्फ रसिका शेट्ये या २३ वर्षीय युवतीला आज संध्याकाळी वाळपई पोलिसांनी अटक केली.
गाडगीळ यांच्या आत्महत्येसंबंधात "गोवादूत'ने सातत्याने पाठपुरावा करीत दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी ही जनतेची मागणी उचलून धरली होती. यासंबंधात गोवादूतमधील वृत्ताचा संदर्भ देत विधानसभेतही आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. गाडगीळ यांच्या आत्महत्येनंतर वाळपई पोलिसांनी जुजबी चौकशी करताना, २० एप्रिल रोजी रसिका शेट्ये हिला बोलावून माहिती घेतली होती, तथापि त्यानंतर चौकशी थंडावल्याचे दिसून आले. गाडगीळ कुटुंबाची व्यथा वारंवार मांडून व त्याचा सतत पाठपुरावा करीत "गोवादूत'ने पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. चार महिन्यांनी का होईना, अखेर संशयिताला अटक झाल्याने वाळपई परिसरात समाधान व्यक्त केले जात असून, इतरांचाही शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी केली जात आहे. पोलिस निरीक्षक हरिष मडकईकर अधिक तपास करीत आहेत.
दि. १८ एप्रिलच्या मध्यरात्री गाडगीळ यांनी धावे येथे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी पोलिसांनी घरात तपासणी केली असता त्यांना मराठीत लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली होती. त्यात "आपली मैत्रीण रसिका ऊर्फ रशिगंधा नाणूस येथे राहणारी ही आपल्या मोबाईलवर टिपलेले काही छायाचित्र दाखवून पैशांची मागणी करीत आहे. तसेच पैसे न दिल्यास हे छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध करू अशी धमकीही देते" असे यात म्हटले होते. तसेच काही मोबाईलचे क्रमांकही या चिठ्ठीत दिले होते. या क्रमांकावरून धमकी दिली जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. तसेच तिने आपला विनयभंग केल्याची खोटी तक्रार पोलिस स्थानकात देणार असल्याचे सांगूनही धमकावल्याचे या पत्रात गाडगीळ यांनी म्हटले आहे. रसिका हिच्याबरोबर अन्य पाच जणांचा सहभाग असल्याचा आरोप गाडगीळ यांच्या पत्नी प्रज्वलिता हिने केला आहे. वाळपई पोलिस स्थानकात रसिकाने २० एप्रिल रोजी जबानी देताना म्हटले होते की, आपल्या ब्युटी पार्लरसाठी लागणारे सामान हे पोस्टातून येत होते. ते आणण्यासाठी आपण पोस्टात जात असे. यावेळी प्रकाश गाडगीळ यांनी आपल्याशी सुत जुळवण्याचा प्रयत्न केला असता मी त्याला दटावले. तेव्हा तो माफी मागायला लागला असता मी त्याच्याकडे पैसे मागितले, अशी माहिती रसिका हिने सुरुवातीस दिली होती. वाळपई भागातीलच काही व्यक्तींचा या प्रकरणात समावेश आहे, अशी माहिती रसिकाने पोलिसांना दिल्याचे समजते.

No comments: