गोव्यातील एका वृत्तपत्राच्या दि. १९ जुलै २०१० च्या अंकातील बातमीप्रमाणे शिवाजी महाराजांनी दापोली तालुक्यातील कळशी गावाजवळची ६५४ एकर जमीन मुस्लिम पीर याकुब बाबरला दान केली होती. ती जमीन अल्पसंख्याक मुस्लिम लोकांच्या वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित केली जावी, अशी सूचना राज्यमंत्री नसीम खान यांनी केली. सध्या त्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते हटविण्यासाठी मूळ दानपत्राचा आधार घेऊन सर्व जमीन वक्फ बोर्डाला मिळावी हे सिद्ध करण्यासाठी कुणीतरी मुस्लिम लेखक शिवचरित्राचे पुनर्लेखन करेल. त्यात महाराजांच्या मुस्लिम पीर आणि संतांना दिलेल्या दानपत्रांचा प्रामुख्याने उल्लेख असेल. महाराजांच्या चाकरीत असलेल्या मुस्लिम सरदारांचा, प्रत्यक्ष सेवेत असलेल्या मदारी मेहतर इत्यादींचा उल्लेख असेल. त्याच्या आधारे ती जमीन परत मिळविण्याचा प्रयत्न होईल. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या चरित्रातील तोच पैलू त्यांना मुसलमानांचे रक्षणकर्ते ठरविण्यासाठी वापरला जाईल. त्याचा अर्थ असा नव्हे की इतिहास बदलला. इतिहास लिहिणाऱ्यांची फार तर इतिहासकालीन घटनांची समीक्षा बदलली असे म्हणता येईल.
महात्मा फुलेंनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या पोवाड्याच्या संदर्भात लेन लिहितो - Although Phule used the Shivaji story to develop an ideology of nonbrahmin protest, he was dependent on the popular oral tradition of the Shivaji narrative (पृ. ६७) हे खरेच आहे. म. ज्योतिबा फुलेंच्या काळात एक ग्रॅंट डफ सोडला तर ऐतिहासिक साधनांचा उपयोग करून लिहिले गेलेले शिवचरित्र उपलब्ध नव्हते, ग्रॅंट डफनेही शिवाजी महाराजांना कलुषित दृष्टीनेच रंगविले आहे. म. फुलेंनी डफच्या चरित्रावरून आणि इतर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे शिवचरित्राची नव्या दृष्टिकोनातून समीक्षा केली एवढेच म्हणता येईल. म. फुलेंच्या पोवाड्यातून लेनला सामाजिक विसंवादच दिसला. तो पुढे लिहितो - Whereas the stories of Shivaji and his brave comrades that Phule repeated became central to the patriotic narrative, his idiosyncratic reading of history as a struggle of Aryans and non-Aryans was not widely influential ( पृ६८). एवढेच नव्हे तर आज महाराष्ट्राच्या राजकारणात शिवाजी महाराजांच्या नावाचा उदोउदो केला जातो; पण ज्या क्षेत्रीय शेतकऱ्यांचा राजा म्हणून म. फुलेंनी शिवाजी महाराजांच्या गौरव केला त्या शेतकऱ्यांना हजारोंच्या संख्येने हताश होऊन आत्महत्या करण्याची पाळी येते हेही वास्तव नाकारता येणार नाही. ते क्षेत्रीय मराठ्यांच्या राज्यात घडते.
१८५७च्या स्वातंत्र्य समरानंतर इंग्रजांनी जवळपास पूर्ण देशात शांतता व दडपशाहीने सुव्यवस्था प्रस्थापित केली असली तरी त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांमुळे त्यांच्याविषयी प्रजेत असंतोष निर्माण होत होता. सर्वसामान्य लोकांपर्यंत स्वातंत्र्य गेल्याची जाणीव होत होती. एकीकडे वासुदेव बळवंत फडके सशस्त्र प्रतिकार करत होते तर दुसरीकडे दादाभाई नौरोजींनी खुद्द इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रजांच्या पार्लमेंटमध्ये भारताचे आर्थिक दुखणे वेशीवर टांगले होते. अशा वेळी महाराष्ट्रात शिवचरित्रापासून स्फूर्ती घेणारे आणि शिवचरित्रांच्या आधारे चळवळीला वैचारिक बैठक देणारे लोक पुढे आल्यास नवल काय? परिपूर्ण ऐतिहासिक साधनांच्या अभावी राजाराम शास्त्री भागवत आणि एकनाथ अण्णाजी जोशी यांच्या सारख्यांनी लिहिलेल्या पोवाड्यांमध्ये शिवाजी महाराजांचे राष्ट्रभक्तीच्या भावनेतून केलेले गुणगान म्हणजे ऐतिहासिक चरित्र नव्हे. त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील संशोधकांनी शिवचरित्रांच्या साधनांचा शोधून काढून त्यांची शहानिशा करून शिवचरित्र ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहिण्यास सुरुवात केली.
Sunday, 15 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment