शिक्षण संचालकांचे पर्रीकर यांना आश्वासन
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): कुडचिरे-डिचोली येथील सरकारी विद्यालयात येत्या सोमवारपर्यंत इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन आज शिक्षण खात्याच्या संचालिका सेल्सा पिंटो यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना दिले.
श्री. पर्रीकर यांनी आज विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सावळो पांडुरंग गावकर व पंच सदस्य राजेंद्र उपसकर तसेच अनेक पालकांसमवेत शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. यावेळी श्रीमती पिंटो यांनी सदर शाळेत येत्या सोमवारपर्यंत इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेची कंत्राट पद्धतीवर नेमणूक केली जाणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, येत्या सोमवारपर्यंत जर शिक्षण खात्याने नियुक्त केलेली शिक्षिका विद्यालयात पोहोचली नाही तर पुढील कारवाई ठरवली जाईल, असे संघाचे अध्यक्ष गावकर यांनी सांगितले.
गेल्या एका महिन्यापासून सदर शाळेत इंग्रजी विषय शिकवण्यासाठी शिक्षिकाच नसल्याने विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार टाकला आहे. कालपासून विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाची शिक्षिका मिळावी यासाठी आंदोलन सुरू केले आहे. आठवी ते दहावीच्या मुलांना इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शेरॉन डायस या शिक्षिकेची २२ जुलै रोजी अन्यत्र बदली झाली होती. त्यानंतर तिच्या जागी दुसऱ्या एका शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, ती शिक्षिका आरोग्य अस्वास्थ्याचे कारण देऊन कामावर रुजू झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एका विषयाची शिक्षिकाच नसल्याने इंग्रजी विषयाची परीक्षाही घेतली गेली नाही, अशी माहिती श्री. गावकर यांनी यावेळी दिली. सरकार शिक्षण क्षेत्रात प्रगती करीत असल्याच्या बाता मारत असे तरी ते सरकारी विद्यालयाला शिक्षकच पुरवू शकत नसल्याने त्याचे पितळ उघडे पडले आहे असा आरोप यावेळी पालक शिक्षक संघाने केला. विद्यार्थ्यांनी कालपासून वर्गावर बहिष्कार टाकला आहे. तरीही शिक्षण खात्याचे डोळे उघडत नसल्यास विद्यार्थी उपोषणालाही बसायला तयार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
Wednesday, 18 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment