Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 16 August 2010

ओमर अब्दुल्लांवर बूट फेकून हल्ला!

श्रीनगर, दि. १५ - जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनाचा सोहळा सुरू असताना आज मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर एका पोलिस उपनिरीक्षकाने बूट फेकून हल्ला केला. या घटनेनंतर लगेच हल्लेखोरास अटक करण्यात आली. या घटनेने तेथे उपस्थित असलेले सर्वजण अचंबित झाले.
मुख्यमंत्र्यांनी तिरंगा फडकावला, त्यानंतर ध्वजाला सलामी देण्याआधीच त्यांच्या दिशेने एक जोडा आला. मात्र बरेच अंतर असल्यामुळे हल्लेखोर पोलिसाने फेकलेला जोडा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला नाही. या घटनेनंतर पकडण्यात आलेल्या पोलिसाची चौकशी सुरू झाली आहे. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा जोडाफेकीच्या व्यत्ययानंतर पुन्हा सुरू झाला आणि नंतर तो निर्विघ्न पार पडला. संबंधित पोलिस अधिकाऱ्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मान्यवर व्यक्तींच्या जोडे भिरकावण्याची जणू फॅशनच आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावर ब्रिटनमध्ये अशाच प्रकारे जोडा भिरकावण्यात आला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे. फुटीर नेत्यांच्या नेतृत्वाखाली वारंवार आंदोलने होत आहे. चेहरा झाकलेल्या तरुणांचे गट सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करत आहेत. पकडण्यात आलेल्या काही तरुणांनी पैसे मिळत असल्याने दगडफेक केल्याचे कबूल केले आहे. मात्र दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात स्थानिकांचे बळी गेल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. आतापर्यन्त चाळीसपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. याच सगळ्या प्रकाराचा निषेध म्हणून पोलीस उपनिरिक्षकाने मुख्यमंत्र्यावर जोड्याने हल्ला केला.

No comments: