Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 20 August 2010

निवृत्त शिक्षक खूनप्रकरणी दिल्लीत संशयितास अटक

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - शेट्येवाडा म्हापसा येथील आल्बर्ट लुईस या निवृत्त शिक्षकाचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी आज दिल्ली येथे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हा तरुण काही महिन्यांपासून याठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी त्याचे नाव उघड करण्याचे टाळले आहे.
रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे गेलेल्या एका पथकाने या तरुणाला अटक करून गोव्यात आणले आहे. आज सायंकाळी रेल्वेमार्गे हे पथक संशयितासह गोव्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे. उत्तर गोवा जिल्हा अधीक्षक अरविंद गावस, म्हापसा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सेमी तावारिस, निरीक्षक राजेश कुमार त्याची चौकशी करीत होते. चौकशी प्राथमिक स्तरावर असल्याचे कारण देऊन त्याविषयीची कोणताही अधिक माहिती देण्याचे पोलिसांनी टाळले.
दि. ३ ऑगस्ट रोजी चामर्स रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या आल्बर्ट लुईस यांच्या भर दुपारी कानफटीत गोळी झाडून खून करण्यात आला होता. यावेळी यावेली मयत आल्बर्ट याची मुलगी विद्यालयातून घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली होती. खुनामागचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. दिल्ली येथून गोव्यात आणलेल्या संशयिताला कोणी खुनाची सुपारी दिली होती की त्याने अन्य कोणत्या कारणासाठी त्याचा खून केला, याचा तपास पोलिस लावत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी संशयिताच्या हाताचे ठसे सापडले होते. त्या ठस्यांचा पोलिस आधार घेत आहेत, त्यामुळे उद्यापर्यंत या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वरिष्ठ पोलिसांनी व्यक्त केली आहे.

No comments: