Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 18 August 2010

गोवा बचाव अभियानाची 'नगर नियोजन'वर धडक

'डीएलएफ'बाबत पक्षपात?
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): दाबोळी येथे वन क्षेत्रातील जागेत "डीएलएफ'कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या वादग्रस्त प्रकल्पाबाबत केंद्रीय वन व पर्यावरण खात्यातर्फे पाठवण्यात आलेल्या पत्रावरून गोंधळ निर्माण झाल्याने गोवा बचाव अभियानतर्फे आज मुख्य नगर नियोजक मुराद अहमद यांना धारेवर धरण्यात आले.
गोवा बचाव अभियानच्या सहनिमंत्रक सेबिना मार्टिन्स व ऍड.क्लॉड आल्वरिस यांच्या नेतृत्वाखाली अभियानाच्या शिष्टमंडळाने आज मुराद अहमद यांची भेट घेतली. अभियानकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात आल्याने त्याचे बांधकाम बंद पाडण्यात आले होते. दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्रीय वन व पर्यावरण खात्याची परवानगी गरजेची असल्याने सदर कंपनीला या प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे व नकाशे पाठवण्याचे आवाहन केले होते. याप्रकरणी मंत्रालयाच्या तज्ज्ञ सल्लागार समितीसमोर मेसर्स सरावती कन्स्ट्रक्शनतर्फे पाठवण्यात आलेल्या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुळात या प्रकल्पाचे नकाशे व कागदपत्रांना नगर नियोजन खात्याची मान्यता गरजेची आहे पण या खात्याने अशा कोणत्याही नकाशांना मान्यता दिली नसल्याचे स्पष्टीकरण मुराद अहमद यांनी केले. मुराद अहमद यांनी केलेल्या स्पष्टीकरणावरून एक तर कंपनीतर्फे मंत्रालयाची दिशाभूल करण्याचा प्रकार घडला असावा किंवा कंपनीतर्फे जुनी कागदपत्रेच पाठवण्यात आल्याचा संशय यावेळी ऍड. आल्वारीस यांनी व्यक्त केला. याप्रकरणी येत्या २० ऑगस्ट रोजी दिल्लीत सुनावणी असल्याने नगर नियोजन खात्याकडून लेखी पत्र मिळवण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

No comments: