Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 16 August 2010

उत्कर्षा मृत्युप्रकरणी तपास पूर्ण

आता प्रतीक्षा "व्हिसेरा' अहवालाची

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) - उत्कर्षा परब या ब्रह्माकरमळी येथील युवतीचे अपहरण आणि मृत्युप्रकरणी सुरुवातीच्या तपासकामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दोघा पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या तपासाचा अहवाल तयार झाला असून तो पोलिस खात्याचे उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. "या प्रकरणाचा तपासकाम पूर्ण झाले असून आम्ही केवळ "व्हिसेरा'च्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत. तो हाती येताच संशयितांवर आरोपपत्र दाखल केले जाणार आहे'' असे आज उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी सांगितले.
उत्कर्षाच्या खुनाचे पडसाद नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात उमटल्यानंतर डिचोलीचे उपविभागीय पोलिस उपअधीक्षक बॉसेट सिल्वा यांना या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणारी उत्कर्षा हिला खोटी माहिती देऊन पळवून नेण्यात आले. त्यानंतर तिला एका ठिकाणी कोंडून ठेवण्यात आले. तेथे तिला विष घातलेला शिरा दिल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप मयत उत्कर्षाच्या वडिलांनी तिच्या मामीवर करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात मामी सौ. गावकर व तिच्या आई वडीला अटक करून पोलिस कोठडीत टाकले होते. सध्या या तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
उत्कर्षाचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूमागील नेमके कारण डॉक्टरांना सापडले नव्हते. त्यामुळे तिचा "व्हिसेरा' हैदराबाद येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. या व्हिसेराचा अहवाल येताच तिला विष देऊन मारण्यात आले होते की अन्य कोणत्या कारणामुळे तिचा मृत्यू झाला हे उघड होणार आहे.
सुरुवातीला संशयितांवर कारवाई करण्यास वाळपई पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी दिरंगाई केल्याचा आरोप करून स्थानिक लोकांनी पोलिस स्थानकावर मोर्चा काढला होता. पोलिस राजकीय दबावाखाली येऊन संशयितांना संरक्षण देत असल्याचा आरोप करताच पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले होते. तसेच, वरिष्ठांनी याची दखल घेतल्यानंतर निरीक्षक वायंगणकर व पोलिस उपनिरीक्षक तेरेंझ वाझ यांची पोलिस मुख्यालयात बदल करण्यात आली होती.
विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आले होते. मात्र तो अहवाल विधानसभा सुरू असताना पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे आता वरिष्ठ पोलिस अधिकारी या अहवालावर कोणती भूमिका घेतात याकडे वाळपईवासीयांचे लक्ष लागले आहे.

No comments: