Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 21 August 2010

आता 'पीपीपी' तत्त्वावर आरोग्य खातेही चालवा

भाजपचा आरोग्यमंत्र्यांना खोचक सल्ला
'आझिलो'प्रकरणी चालढकल संतापजनक
पणजी,दि.२० (प्रतिनिधी): म्हापशातील जुन्या आझिलो इस्पितळातील काही विभाग नव्या जिल्हा इस्पितळाच्या इमारतीत हालविण्यासंबंधी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याबाबत अद्याप काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या डोक्यात "पीपीपी' चे भूतच नाचत असल्याने त्यांनी आता आपले आरोग्य खातेही "पीपीपी' तत्त्वावर चालवण्यासाठी निविदा मागवणेच रास्त ठरेल,असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हाणला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर हजर होते.उत्तर गोव्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या सध्याच्या आझिलो इस्पितळाची दुर्दशा सर्वांनाच परिचित आहे. या इस्पितळाची दुर्दशा भाजपने सरकारसमोर मांडल्यानंतर खुद्द आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनीही त्याची खातरजमा केली होती. भाजपने याप्रकरणी १५ ऑगस्टची मुदत सरकारला दिली होती. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनामुळे भाजपने आपले आंदोलन स्थगित ठेवले असले तरी अजूनही या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने या विषयावरून भाजपला पुन्हा रस्त्यावर येणे भाग पडेल,असा इशारा यावेळी प्रा.पार्सेकर यांनी दिला.
जिल्हा इस्पितळ सुरू करण्याबाबत सरकार जनतेची फसवणूक करीत आहे हे जरी खरे असले तरी न्यायालयाचीही दिशाभूल करण्याची कृती सरकारकडून होत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. या इस्पितळावरून आरोग्य खात्याचे अवर सचिव दत्ताराम सरदेसाई यांनी आत्तापर्यंत सहा वेळा न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून वेळोवेळी भूमिका बदलल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. या इस्पितळातील अद्ययावत यंत्रणा हाताळण्यास डॉक्टर,सल्लागार व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवल्याने हे इस्पितळ "पीपीपी' पद्धतीवर सुरू करण्याचा विचार असल्याचे खात्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. ही असमर्थता दर्शवणारे हे अधिकारी कोण, हे सरकारने उघड करावे,अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ही यंत्रणा वापरण्यास आरोग्य खात्याचे अधिकारी असमर्थ आहेत याची खबर ही यंत्रणा खरेदी करताना लक्षात आली नाही काय,असाही सवाल यावेळी प्रा.पार्सेकर यांनी केला.
जुने आझिलो इस्पितळ पूर्णतः नव्या जागेत स्थलांतरित करणे एका फटक्यात शक्य नसले तरी बाह्य रुग्ण विभाग(ओपीडी) व शवागार जिल्हा इस्पितळ इमारतीत तात्काळ स्थलांतरित करण्याचे आश्वासन सरकारने विधानसभेत दिले होते. मात्र अजूनही त्या दृष्टीने सरकार चालढकलपणा करीत असल्याचा आरोप प्रा.पार्सेकर यांनी केला. या प्रकरणी सरकारचा चालढकलपणा म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार असून येत्या चतुर्थीपूर्वी या इस्पितळाचे स्थलांतर झाले नाही, तर भाजपला रस्त्यावर उतरणे भाग पडेल,असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. स्वाईन फ्लू प्रकरणे वाढत चालली आहेत. आरोग्य खात्याचा एकूण कारभारच हाताळण्यात आरोग्यमंत्री अपयशी ठरल्याने त्यांनी आता हे खातेच "पीपीपी' धर्तीवर चालवण्यास द्यावा,असा उपरोधिक टोला यावेळी प्रा.पार्सेकर यांनी हाणला.

No comments: