शशिकलाताईंचा प्रतिटोला
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)- गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी सुरू केलेल्या काही गोष्टींचा पाठपुरावा करण्यातही अपयशी ठरलेल्या सरकारला त्यांना दूषणे देण्याचा कोणताच अधिकार पोहचत नाही. गोव्याला विशेष राज्याचा दर्जा हा मुक्तीनंतर नव्हे तर गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यावेळी पदरात पाडून घेणे योग्य होते, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा स्व.भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कन्या शशिकलाताई काकोडकर यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याला विशेष राज्याचा दर्जा न मिळण्यामागे गोवा मुक्तीनंतरच्या तत्कालीन नेतृत्वावर अर्थात अप्रत्यक्ष भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावरच ठपका ठेवण्याचा प्रकार काल घडला. यासंबंधीचे वृत्त दै. "गोवादूत' मधून प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या वृत्तासंबंधी अनेकांनी कामत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पत्रकारांवरच दोष ठेवत आपल्या तोंडी कुणीतरी चुकीचे वृत्त घातल्याची भूमिका घेतली. राजभवनावर चहापानावेळी आपण मुख्यमंत्र्यांना या वृत्तासंबंधी विचारले, असे ताई यांनी एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आपण असे म्हटलेच नाही,असा पवित्रा कामत यांनी त्यावेळी घेतला,असे त्यांनी नमूद केले. मुक्तीनंतर गोव्याला संघप्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता व त्यामुळे त्याकाळात गोव्याला विशेष राज्याचा दर्जा मिळवून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गोव्याला खरोखरच विशेष राज्याचा दर्जा मिळावा अशी जर कॉंग्रेसची इच्छा होती, तर १९८७ साली गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला, त्यावेळी ही मागणी पदरात पाडून का घेण्यात आली नाही, असा प्रतिसवाल श्रीमती काकोडकर यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या वृत्ताबाबत मौन धारण करणेच पसंत केले. आपण मुख्यमंत्र्याशी यासंबंधी बोललो तेव्हा त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य केल्याचा इन्कार केला, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली. या वृत्तामुळे राज्यातील भाऊ समर्थकांत मात्र तीव्र नाराजी पसरली आहे. गोव्याचे वाटोळे करण्यासाठी पुढे सरसावलेल्या नेत्यांनी भाऊंच्या स्वच्छ प्रतिमेवर चिखलफेक करण्याचा दुरान्वयेही प्रयत्न करू नये, अन्यथा अशा वाचाळगिरीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराच यावेळी त्यांनी दिला.
Monday, 16 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment