Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 16 August 2010

वालंका बाणावलीतूनच निवडणूक लढविणार

चर्चिल आलेमाव यांनी दंड थोपटले

मडगाव, दि.१५ (वार्ताहर) - "कॉंग्रेसचे तिकीट मिळो वा न मिळो, पण वालंका येत्या विधानसभा निवडणुकीत बाणावलीतून रिंगणात उतरणारच,' असे स्पष्ट संकेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल यांनी आज बाणावली येथे दिले. त्यामुळे यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष ठरणार असल्याचे स्पष्ट झाले.
आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर बाणावली येथील होली ट्रिनिटी चर्चजवळील अवर लेडी ऑफ ऍझम्पशनमध्ये वालंका यांच्या प्रचार कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. एकप्रकारे त्यांच्या प्रचाराचा नारळच फोडल्यासारखा बार उडवून देण्यात आला.
चर्चिलखेरीज नगरविकास मंत्री ज्योकिम आलेमाव, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष श्रीमती मारिया रिबेलो, मडगावचे नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो, प्रतिमा कुतिन्हो,फातिमा आलेमाव, जिल्हापंचायत सदस्य, नावेली व बाणावली मतदारसंघांतील सरपंच पंच यांची व्यासपीठावर गर्दी होती.
वालंकाच्या पाठीशी लोकांची ताकद एकवटली आहे. ती ओळखून पक्षाने तिला तिकीट द्यायला हवे. ते दिले तर बरेच झाले; पण ते मिळाले नाही तर ती लोकांच्या पाठिंब्यावर रिंगणात उतरेल हे नक्की. यासंदर्भात त्यांनी नावेलीत आपणाला लोकांनी दिलेले प्रेम व पाठिंबा याचे उदाहरण दिले. त्यावरून कॉंग्रेस नेत्यांनी योग्य तो बोध घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. त्यांनी नाव न घेता मिकी पाशेकोंवर टीका केली व तेथील खुंटलेल्या विकासाला तेच जबाबदार असल्याचे सांगितले.आता बाणावलीतील विकासकामांबाबत वालंकाशी संपर्क साधा व ती पूर्ण करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
घराणेशाहीच्या राजकारणावर बोलणाऱ्यांची त्यांनी निर्भत्सना केली. येथे घराणेशाहीचा प्रश्र्नच उद्भवत नाही नेहरू व गांधी घराण्याने देशासाठी काम केले. म्हणूनच लोकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली, असे ते म्हणाले.
मंत्री ज्योकिम आलेमाव यांनी कॉंग्रेसने गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्र्वासनाला जागून वालंकाला तिकीट द्यायलाच हवे, तिला ते हमखास मिळेल, अशी खात्री व्यक्त केली. त्यांनी बाणावलीतील लोक आजवरच्या घडामोडींतून योग्य तो धडा घेतील असे सांगताना हा मतदारसंघ म्हणजे कोणाची खासगी मालमत्ता नव्हे, असा टोला मिकी समर्थकांना लगावला. वालंकाविरुद्ध अफवा उठविणाऱ्यांनी बाणावलीत तिच्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
आपले आजवरचे काम पाहून कॉंग्रेसकडून आपणास बाणावलीतून तिकीट मिळेल असा विश्वास वालंका आलेमाव यांनी व्यक्त केला. मात्र यदाकदाचित ते मिळाले नाही तर आपण लोकांप्रत जाऊन त्यांचा कौल मागेन. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवेन त्यासाठी कोणाशीही टक्कर देण्यास आपण समर्थ आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पंचायत अध्यक्ष श्रीमती मारिया रिबेलो यांनी आपणाविरुद्ध अपप्रचार करणाऱ्यांचा समाचार घेताना, आपले संपूर्ण कुटुंब वालंकाबरोबर असल्याचे जाहीर केले. ऍड माईक मेहता, ऍड. प्रतिमा कुतिन्हो, कल्वर्ट गोन्साल्विस, घनःश्याम शिरोडकर, बबीता वाझ, अँथनी पिंटो व इतरांची भाषणे झाली. कार्यक्रमाला बाणावलीतील हजारांहून अधिक चर्चिलसमर्थक हजर होते. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

No comments: