संचालिका राधा भावे यांनी दिलेली माहिती
पणजी, दि.१७ (सांस्कृतिक प्रतिनिधी): गुळे सत्तरी येथे दत्ता चंद्रकांत परब यांनी शोधून काढलेल्या चारही मूर्ती गोवा पुरातन वस्तुसंग्रहालयात आणल्याची माहिती गोवा पुरातन संग्रहालयाच्या संचालिका सौ. राधा भावे यांनी दिली.
सदर मूर्ती या पुरातन आणि अत्यंत दुर्मीळ असल्याने त्यांचे जतन होणे गरजेचे आहे. म्हणूनच मूर्तींसंदर्भात माहिती मिळताच दत्ता परब यांच्याशी संपर्क करून त्या वस्तूसंग्रहालयात आणण्यात आल्या. या कामात दत्ता परब यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचेही त्या म्हणाल्या.
त्यामध्ये वेताळाची एक तर तीन देवींच्या मूर्ती आहेत. देवीच्या मूर्तीच्या बाजूला हत्ती असल्याने त्या मूर्ती गजांतलक्ष्मीच्या असल्याचे दिसून येते. तसेच मूर्ती जोडूनच कदंब काळाची निशाणी असल्याने त्या मूर्ती कदंबकाळातील असाव्यात, असा अंदाज आहे. वेताळाची मूर्ती १६ व्या शतकातील असावी, असेही त्या म्हणाल्या.
वेताळ मूर्तीची उंची ८७ इंच आहे. डोक्यावर नागाच्या आकृतीचा मुकुट, गोलाकार डोळे, थोडेसे उघडे तोंड व त्यातून बाहेर दिसणारे सुळे, पीळ घातलेली मिशी, मूर्तीच्या पोटावर विंचवाची आकृती असून बरगड्या स्पष्ट दिसत आहेत. उजव्या हातात तलवार धरलेली असून धारेकडील बाजू मोडली आहे; तर डाव्या हातात पात्र धरले आहे. त्याच्या हातात नागपाश आहे. गळ्यातून पायापर्यंत नरमुंड माळा असून ती पाठीमागेसुद्धा पूर्ण कोरली आहे. पायाकडील भागात ३ इंच व्यासाचे पुरुष व स्त्रियांचे मुखवटे कोरले आहेत. वेताळ संप्रदाय हा सुमारे सातव्या शतकापासून प्रचलित आहे, असे इतिहासकारांचे मत आहे.
गजांतलक्ष्मी पाषाणी मूर्तीची उंची २९ इंच लांबी ५९ इंच व जाडी ६ इंच आहे. हे शिल्प म्हणजे विविध चित्रांचा समूहच. प्रत्येक चित्र म्हणजे एक वेगळा विचार, तत्त्वज्ञान दृष्टिकोन मांडण्यात यशस्वी ठरला आहे. या पाषाणातील मूर्ती पद्मासनात असून तिच्या दोन्ही हातात फुलांसारख्या वस्तू आहेत. डोक्यावर मुकुट व गळ्यात विविध अलंकार आहेत. ही मूर्ती गजांतलक्ष्मी असल्याचे जाणवते. कारण तिच्या दोन्ही बाजूला हत्ती असून ते देवीच्या मस्तकावर घड्यातून जलाभिषेक करत असल्याचे दिसून येते. गजलक्ष्मी स्वरूपात इंद्रायणी धनलक्ष्मी आणि धान्यलक्ष्मीलाही पुजले जाते. देवीच्या हाती वज्र असते तेव्हा ती सप्तमातृकातील इंद्रायणी असते. हातात कणस असते तेव्हा ती धान्यलक्ष्मी ठरते. देशाच्या विविध भागांत ती 'केळबाई' म्हणूनच मान्यता पावली आहे.
Wednesday, 18 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment