Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 20 August 2010

भाजप युवा मोर्चा आणि विद्यार्थी विभागाचा विद्यापीठ कुलगुरू व कुलसचिवांना घेराव

विद्यार्थी मंडळ निवडणूक तातडीने घेण्याचे आश्वासन

पणजी,दि. १९ (प्रतिनिधी)- गोवा विद्यापीठातील गेली तीन वर्षे सतत पुढे ढकलण्यात येणारी विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक त्वरित घेण्यात यावी या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा व विद्यार्थी विभागाच्या सदस्यांनी गोवा विद्यापीठात जाऊन कुलगुरू प्रा. दिलीप देवबागकर आणि कुलसचिव मोहन सांगोडकर यांना घेराव घातला.
दोन वर्षांपूर्वी विद्यार्थी मंडळावर भाजप पुरस्कृत पॅनल निवडून आले होते. मात्र सदर निवडणूक ग्राह्य धरण्यात आली नव्हती. त्यावेळी भाजप पुरस्कृत पॅनलने जोरदार निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर भाजपपुरस्कृत पॅनेल व भाजप युवा मोर्चातर्फे वारंवार निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली; मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे चवताळलेल्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी आज भाजप युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत,सरचिटणीस सिद्धेश नाईक व विद्यार्थी विभाग प्रमुख आत्माराम बर्वे यांच्या नेतृत्वाखाली गोवा विद्यापीठावर धडक देऊन कुलगुरू प्रा. दिलीप देवबागकर व कुलसचिव मोहन सांगोडकर यांना घेराव घातला व गेली दोन वर्षे घेण्यात न आलेली विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ निवडणूक त्वरित घेण्याची तसेच परीक्षेचा निकाल देण्यास होत असलेला विलंब टाळावा अशी मागणी केली.
सर्वप्रथम या मंडळीने कुलसचिव मोहन सांगोडकर यांना घेराव घातला. त्यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली आणि त्यांना भंडावून सोडले. सुमारे एक तास सांगोडकर यांना युवा कार्यकर्त्यांच्या प्रश्नांच्या भडिमाराला तोंड द्यावे लागले. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी "भारतीय युवा मोर्चा व विद्यार्थी विभागाचा विजय असो' अशा जोरदार घोषणा देऊन विद्यापीठ परिसर दणाणून सोडला. त्यानंतर कुलगुरूंच्या कक्षात जाऊन त्यांच्याकडे निवडणूक विलंबाचा खुलासा मागण्यात आला. कुलगुरू प्रा.देवबागकर यांनी या वर्षी विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची निवडणूक घेण्याचे ठरले आहे, असे सांगितले. मात्र युवा कार्यकर्त्यांनी, त्वरित निवडणूक अधिसूचना जारी करण्याची मागणी लावून धरली व कुलगुरूंना स्पष्ट आश्वासन देण्याबाबत सुनावले. युवा कार्यकर्त्यांच्या जोरदार मागणी नंतर कुलगुरूंनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून आणून परवाच निवडणुकीची अधिसूचना काढण्याचा आदेश दिला. तसेच निकालाबाबत असलेला घोळ दूर करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले.
युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सरचिटणीस सिद्धेश नाईक, विद्यार्थी विभाग प्रमुख आत्माराम बर्वे, मिलिंद होबळे, रूपेश महात्मे, भगवान हरमलकर, दीपक कळंगुटकर, आदेश उसगावकर, दुर्गादास कामत, अपूर्वा पारकर, मनाली नाईक, सिद्धी नाईक,डेहला डेनिस, निकिता गावकर यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी या घेराव कार्यक्रमात भाग घेतला.
या यशस्वी घेरावानंतर डॉ. प्रमोद सावंत, सिद्धेश नाईक व आत्माराम बर्वे यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याचे स्पष्ट केले. भाजप युवा कार्यकर्ते विद्यार्थ्यांसाठी कार्य करतात व त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात यशस्वी होतात हे आज पुन्हा सिद्ध झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

No comments: