म्होरक्यासह संशयितांना चौदा दिवसांची कोठडी
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य दलाल कृष्णगोपाळ कुमार याच्याशी संबंध असलेले पोलिस अधिकारी तसेच अन्य पोलिसांची यादी पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी मागितली असल्याची माहिती मिळाली आहे. चार वर्षापासून कुमार गोव्यात वेश्याव्यवसाय जोरात चालवित होता. त्यात त्याला पोलिसांचेही सहकार्य मिळत असल्याचे उघड झाले होते. याच कारणावरून पेडणे पोलिस स्थानकातील एका पोलिस शिपायालाही निलंबित करण्यात आले होते. कुमार याला अटक झाल्याने अनेक पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. अमली पदार्थ व्यवहारात पोलिसांचे साटेलोटे असल्याचे यापूर्वीच उघड झाल्याने बदनाम झालेले गृहखाते आता कोणती पावले उचलते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
कुमार याची गोव्यात करोडो रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. म्हापसा येथे बंगला व अनेक ठिकाणी त्यांनी भूखंड विकत घेतल्याचे उघड झाले आहे. त्याच्या या सर्व मालमत्तेची चौकशी केली जात असून ती जप्त करण्यांचीही तयारी पोलिसांनी चालवली आहे. ही सर्व मालमत्ता वेश्याव्यवसायातून त्याने कमवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आज सायंकाळी अटक करण्यात आलेल्या संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून चौदा दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार याचे गोव्यात तसेच गोव्याबाहेरही मुली पुरवण्याचे प्रचंड मोठे जाळे आहे. एक मुलगी पुरवण्यासाठी कमीत कमी दहा हजार रुपये तर, अल्पवयीन मुलीसाठी पन्नास हजार रुपये आकारले जात होते, अशीही माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. २००९ साली कुमार याने गोव्यात बराच जम बसवला होता. त्यानंतर वेश्याप्रकरणाच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकू लागल्याने व त्यात एका पोलिसालाही अटक झाल्याने त्याने आपला तळ गोवा शेजारच्या कोकणातील बांदा येथे हलवला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो पुन्हा गोव्यात सक्रिय झाल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हा प्रमुखांना मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला.
पेडणे परिसरातील पोलिस त्याच्या संपर्कात होते. ग्राहकांकडून मुलींची मागणी आल्यानंतर त्यांना तो पेडणे परिसरातच त्या आणून पुरवीत होता. त्यामुळे त्याला पेडण्यातच गाठून अटक करण्याचा वरिष्ठांनी सापळा रचला, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुलींची मागणी आल्यानंतर तो त्या ग्राहकाला आधी कळंगुट येथे जाण्यास सांगत असे. तेथे दुर्गेश राय हा त्याचा म्होरक्या त्या ग्राहकाची खातरजमा करीत असे तसेच तो कोणत्या हॉटेलमध्ये उतरला आहे, याचीही चौकशी केल्यानंतर कुमार याच्याशी संपर्क साधून मुली आणण्यासाठी हिरवा कंदील दिला जात होता. त्यानंतर बांदा येथून या मुलींना पेडणे परिसरात आणून त्या ग्राहकांच्या ताब्यात दिल्या जात होत्या.
मात्र यावेळी कळंगुट येथील त्याच्या म्होरक्यालाच पोलिसांनी आधी अटक केल्याने कुमार अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या छाप्याच्या मोहिमेची सर्व जबाबदारी हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्यावर सोपवण्यात आली होती. या कारवाईत उपनिरीक्षक विदेश पिळगावकर, हवालदार संतोष वेंगुर्लेकर, विनय श्रीवास्तव व गोविंद गावस यांनी भाग घेतला, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
Thursday, 19 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment