दुकान वाटप घोटाळाप्रकरण
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - पणजी महापालिका बाजारातील दुकान वाटप प्रकरणात झालेल्या घोटाळ्यावर बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीत प्रचंड गदारोळ माजला. ज्या नगरसेवकांवर या घोटाळ्यांचा आरोप झाला आहे, त्यांनी तर अक्षरशः अकांडतांडव करून या बैठकीला मासळी बाजाराचेच स्वरूप आणले होते. तसेच, ज्यांच्या दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहे, त्यांना दुकानाची कागदपत्रे सादर करण्यास पंधरा दिवसांची शेवटची मुदत देण्यात आली आहे. या गोंधळात सत्ताधारी गटातीलच काही नगरसेवकांनी आरोपप्रत्यारोप करायला सुरुवात गेली. तर, महापौर कॅरोलिना पो आणि माजी महापौर टोनी रॉड्रिगीस यांचीही या मुद्यावरून बरीच शाब्दिक चकमक झाली. शेवटी या प्रकरणावर उजेड टाकण्यासाठी पालिका समितीची स्थापना करण्यात येऊन मध्येच राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. या अचानक सुरू झालेल्या राष्ट्रगीताच्यावेळी काही नगरसेवक आपल्या आसनावर बसून होते. त्यामुळे राष्ट्रगीताचाही या बैठकीत अपमान करण्यात आला.
पणजी महापालिका बाजार संकुलातील दुकाने लाखो रुपयांत विकण्यात आल्याचा घोटाळा विरोधकांनी उघडकीस आणल्यानंतर आज यावर खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ४.३० वाजता बैठकीला सुरुवात होताच बैठकीत प्रचंड गदारोळ सुरू झाला. विरोधकांनी घोटाळ्याबद्दल बोलायला सुरुवात करताच प्रचंड गदारोळ सुरू झाला. यावेळी नगरसेवक उदय मडकईकर, स्वीकृत नगरसेवक दया कारापूरकर यांनी तावातावाने बोलायला सुरुवात केली. तसेच, कोणी घोटाळा केला, असा उलट प्रश्न करून दुकान वाटपाची पालिकेकडे कोणतीही कागदपत्रे असल्यास ती दाखवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी २००३ पासूनची कोणतीही कागदपत्रे पालिकेत उपलब्ध नसल्याचे पालिका आयुक्त एल्विस गोम्स यांनी सांगितले. यावेळी महापौर कॅरोलिना पो यांनी आपल्या कार्यकाळात हा घोटाळा झाला नसल्याचा दावा करीत तो यापूर्वीच झाला होता, असा आरोप केला. त्यावेळी माजी महापौर टोनी रॉड्रीगीस यांनी उभे राहून सरळ पो यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. "मी तीन वर्षे महापौर होतो. तेव्हा कोणताही घोटाळा झाला नाही. तसेच, पालिकेचे दुकान फोडून त्याला नवीन शटर बसवण्याची हिंमत कोणाची झाली नाही, असा दावा करून हे सर्व तुमच्यात कार्यकाळात सुरू आहे' असा आरोप श्री. रॉड्रिगीस यांनी श्रीमती पो यांच्यावर केला. तसेच, या दुकानांची कोणतीही कागदपत्रे सापडत नसल्यास त्याला पालिकेच्या प्रशासन वर्गाला जबाबदार धरा, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याने त्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत केली जावी, अशी जोरदार मागणी यावेळी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी केली. मात्र ही मागणी ताबडतोब फेटाळून लावण्यात आली. पालिकेतील दुकानांकडून कोणतीही महसूल पालिकेला येत नाही, त्यामुळे पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. ही दुकाने पालिकेची मालमत्ता आहे, असा दावा यावेळी अविनाश भोसले यांनी केला.
दुकानांचे वाटप मनमानीपणे करण्यात आले आहे, असा आरोप होताच, श्री. रॉड्रिगीस यांनी ही दुकाने ज्यांची आहेत, त्यांच्याशी रक्ताचे नाते असलेल्याच व्यक्तीच्या नावे ती करावीत, अशी सूचना बाबूश मोन्सेरात यांनी केल्याची आठवण यावेळी करून दिली. जुना बाजार मोडल्यानंतर जे लोक रस्त्यावर बसून विक्री करीत होते, त्यांनीही याठिकाणी दुकाने देण्यात आल्याचा आरोप यावेळी उदय मडकईकर यांनी केला. याची २००३ सालापासून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी मडकईकर यांनी केली.
काही नगरसेवकांकडे वीस वाहने आहेत, हे महापौर यांचे वक्तव्य एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने नगरसेवक उदय मडकईकर यांनी महापौरांवर जोरदार हल्ला चढवला. कोण हा नगरसेवक, त्याचे नाव महापौरांनी उघड करावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावेळी बिथरलेल्या महापौरांनी सरळ त्याठिकाणी पत्रकारांना बसण्यासाठी असलेल्या जागेकडे बघत त्या वर्तमानपत्राचे कुणी असल्यास त्याने उभे राहून त्या बातमीबद्दल स्पष्टीकरण द्यावे, असे फर्मान सोडले. शेवटी काही नगरसेवकांनीच महापौरांना खाली बसण्यास भाग पाडले. शेवटी गोंधळातच या बैठकीचा समारोप करण्यात आला.
Tuesday, 17 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment