Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 19 August 2010

काटेबाग - पैंगिणीत आणखी एक बुडाला

काणकोण, दि. १८ (प्रतिनिधी) : काल दि. १७ रोजी इडगर - पैंगिण येथे एकजण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आज (दि. १८) काटेबाग - पैंगीण येथे गालजीबाग नदीत आणखी एकजण बुडाल्याची घटना घडली आहे.
काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज काटेबाग - पैंगिण येथील पॅट्रिक फ्रान्सिस बार्रेटो हा ३५ वर्षीय इसम सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गालजीबाग नदीत गळ लावून मासेमारी करण्यासाठी गेला होता. साडे सात वाजण्याच्या सुमारास तो पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला व बुडाला. घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधाशोध केली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांची व पर्यटन खात्याच्या जीवरक्षकांचीही मदत घेण्यात आली. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत सदर युवकाचा थांगपत्ता लागू शकला नव्हता, अशी माहिती काणकोणचे निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी दिली.
दरम्यान, काल (दि. १७) इडगर - पैंगिण येथील मोहन बाळकृष्ण च्यारी हे ५२ वर्षीय गायक कलाकार गाळये भागात जात असता सकाळी १०.३०च्या सुमारास सिमेंट - कॉंक्रीटच्या निसरड्या झालेल्या बंधाऱ्यावरून चालताना घसरून नदीच्या पात्रात पडले होते व वाहून गेले होते. त्यावेळी पोलिस, अग्निशमन दलाचे जवान व जीवरक्षकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज संध्याकाळपर्यंत त्यांचाही शोध लागला नव्हता, अशी माहिती निरीक्षक देसाई यांनी दिली.

No comments: