म्हापसा, दि. १५ (प्रतिनिधी) - कांदोळी येथे समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या सदानंद शांताराम कांदोळकर (४६) व संजय भालचंद्र हरमलकर (३०) टिटोवाडा नेरुल या दोघा जणांना आज समुद्रात रुतून बसलेल्या रिव्हर प्रिन्सेस जहाजानजीक जलसमाधी मिळाली, तर दोघे सुखरूप बचावले. ही घटना सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. एकाचा मृतदेह मिळाला असून रात्री उशिरापर्यत संजय याचा मृतदेह हाती लागलेला नव्हता. किनारा रक्षक दलाच्या साहाय्याने उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
अधिक माहितीनुसार, सदानंद कांदोळकर, त्याचा भाऊ गोपाळकृष्ण कांदोळकर, केरी पेडणे येथील त्यांचा कामगार भोलाराम सुनील दास (३६) व नेरुल येथील संजय हरमलकर हे चौघे पहाटे पाच वाजता फायबरची बोट घेऊन मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात उतरले होते. समुद्र खवळलेला असल्याने एका मोठ्या लाटेत त्यांची होडी समुद्रात उलटली व चौघेही पाण्यात फेकले गेले. त्यातील गोपाळकृष्ण व भोलाराम या दोघांना पोहून समुद्राच्या किनाऱ्यावर येण्यात यश आले. तर, सदानंद व संजय यांचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. घटनेनंतर किनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकाने त्यांना वाजवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याला यश आले नाही. अथक प्रयत्नानंतर सदानंद याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठविला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संजय याचा मृतदेह शोधण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक गौरेश परब करीत आहेत.
Monday, 16 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment