Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 15 November 2008

आचारसंहिता भंगप्रकरणी चौघा नेत्यांना नोटिसा

पणजी,दि.१४ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून त्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा व खासदार शांताराम नाईक यांचा समावेश आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याविरोधातही एक तक्रार आजच दाखल झाल्याने त्याबाबतचा अभ्यास सुरू आहे,अशी माहिती संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी के.बी.सुरजुसे यांनी दिली.
आचारसंहिता लागू झाल्याने सरकारी प्रशासन ठप्प झाले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंत्र्यांनी केलेल्या विविध घोषणा व आपल्या पदाचा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापर करण्याचे प्रकार घडल्याने त्याची गंभीर दखल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आहे. सध्या अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारींपैकी दोन तक्रारी भाजपकडून दाखल करण्यात आल्या आहेत. वास्कोचे माजी नगराध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी महसूलमंत्री जुझे फिलिप, तर पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांचे समर्थक ऍड.कृष्णा नाईक यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आचारसंहिता काळात गोव्यातील मुस्लिम बांधवांसाठी हाज यात्रेसाठी खास थेट विमानसेवा पुरवण्याची घोषणा केली होती. कामत सरकारला पाचशे दिवस पूर्ण झाल्याने त्यानिमित्ताने वृत्तपत्रांतून विविध योजना व घोषणांची जाहिरातबाजी करण्यात आल्याचा आक्षेपही भाजपने घेतला. याच काळात आरोग्य खात्यातर्फे प्राध्यापक व साहाय्यक प्राध्यापकाच्या नेमणुकीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तक्रारही भाजपने केली आहे. दरम्यान, याप्रकरणी सदर तक्रारीची दखल घेत संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा जारी करण्यात आल्याचे श्री.सुरजुसे म्हणाले. याप्रकरणी संबंधितांचा खुलासा आल्यानंतरच पुढील कारवाईची दिशा ठरेल,असेही ते म्हणाले.
वास्कोचे माजी नगराध्यक्ष आल्मेदा यांनी, महसूलमंत्री डिसोझा यांच्याकडून आचारसंहिता काळात बायणा वास्को येथे रवींद्र भवनाच्या पायाभरणी कार्यक्रमात विविध घोषणा झाल्याचा ठपका ठेवून तक्रार दाखल केली आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी आपली अधिकृत मंत्रिपदाच्या वाहनाचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मंत्री आजगावकर यांचे समर्थक ऍड.कृष्णा नाईक यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.पेडणे तालुक्यातील एका धार्मिक ठिकाणी कार्यक्रमाला आपले अधिकृत वाहन वापरल्याचा तसेच या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

No comments: