Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 13 November 2008

पाळीत तिरंगी लढत

डॉ. प्रमोद सावंत यांना अनुकूल वातावरण
पणजी,डिचोली, दि. १२ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत संपल्यानंतर आता एकूण पाच उमेदवार रिंगणात उरले आहेत. भाजपने उमेदवारी नाकारल्याने बंडाचा पवित्रा घेतलेले माजी आरोग्यमंत्री डॉ.सुरेश आमोणकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला आपला अर्ज मागे न घेण्याचा निर्णय घेतल्याने आता डॉ.आमोणकर, कॉंग्रेसचे प्रताप गावस व भाजपचे डॉ.प्रमोद सावंत यांच्यातच ही तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सातू माईणकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने अखेर एकूण पाच उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सेव्ह गोवा फं्रटतर्फे जुझे लोबो तर राजेंद्र नरसिंह राणे हे अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरले आहेत. दरम्यान,विद्यमान परिस्थितीत कॉंग्रेस आघाडी सरकारने चालवलेल्या कारभारामुळे राज्याचे वाटोळे होण्याची जास्त शक्यता असल्याने निदान या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपला या सरकारच्या भानगडी जनतेपर्यंत नेण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. डॉ.आमोणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी अनेक भाजप नेत्यांनी शेवटपर्यंत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अखेर फोल ठरला. डॉ.आमोणकर यांच्या उमेदवारीमुळे त्याचा मोठा परिणाम भाजपवर होण्याची अजिबात शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली. कॉंग्रेसला धडा शिकवण्यासाठी या संधीचा योग्य वापर या पोटनिवडणुकीद्वारे करून घेण्यासाठी भाजप कार्यकर्ते सक्रिय बनले आहेत. भाजप पक्ष हा महत्त्वाचा असून व्यक्तिपूजेला स्थानच नाही. त्यामुळे भाजपचे मतदार कमळावरच शिक्का मारतील,असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी ही खिचडी बनली आहे. दिगंबर कामत सरकारवर एकामागोमाग एक संकटे ओढवत असताना केवळ केंद्र सरकारच्या आशीर्वादाने हे सरकार टिकून आहे. याची पूर्ण जाणीव राज्य सरकारलाही आहे,असेही यावेळी सांगण्यात आले. केंद्रात लोकसभा निवडणूक जाहीर झाली की गोव्यातील सरकार गडगडेल याची पूर्ण जाणीव लोकांना असल्याने पाळीमध्ये भाजपचे उमेदवार डॉ.प्रमोद सावंत यांना विजयी करणेच योग्य ठरेल,असा सार्वत्रिक सूर दिसून येतो. पाळी मतदारसंघाचे माजी आमदार स्व. गुरूदास गावस यांची झालेली उपेक्षा व या सरकारकडून ठप्प झालेला विकास यामुळे लोक कॉंग्रेसला विटले आहेत.
दरम्यान, पाळीमध्ये कॉंग्रेसच्या प्रचारसभेत भाषण ठोकण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना विद्यमान प्रकरणांबाबत थेट जाब विचारण्याची तयारीही काही युवकांनी ठेवली असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: