दहशतवादी घटना नाही
मेरठ, दि. ८ - मेरठ शहरातील बंगाली बस्ती या भागातील कचराघरात मॉर्टर शेलचा(उखळी तोफेत वापरण्यात येणारा गोळा) स्फोट होऊन त्यात पाच जण ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत असे सांगून पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हे दहशतवादी कृत्य नाही.
कचरा गोळा करणाऱ्यांना लष्करातील मॉर्टर शेल सापडला. त्याची ठोकपीट करीत त्यातून धातू काढत असताना त्याचा स्फोट झाला, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुवीर लाल यांनी सांगितले. स्फोटात ठार झालेल्यांची ओळख पटली असून या सर्वांचे वय १० ते १७ वर्षे आहे. जखमी झालेल्या तिघांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
बहुतांश बांगलादेशी लोकांची वस्ती असलेल्या ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागाची पोलिसांनी झडती घेतली असता अशाचप्रकारचा आणखी एक मॉर्टर शेल पोलिसांना आढळून आला आहे. हा स्फोट म्हणजे केवळ एक अपघात आहे, अतिरेक्यांनी घडवून आणलेला स्फोट नाही. असे असले तरी या भागातील कचराघरात हे तोफगोळे कसे आले याचा शोध आम्ही घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
Sunday, 9 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment