पाळी पोटनिवडणुकीत राजकीय पेच
पणजी,दि. १० (प्रतिनिधी)-पाळी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली असताना एक वेगळाच राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पाळीवर पुन्हा एकदा आपल्या वर्चस्वाची भाषा करणाऱ्या कॉंग्रेससमोर या निवडणुकीपूर्वी सरकारवरच संक्रांत ओढवू शकते. पाळी पोटनिवडणुकीसाठी उद्या ११ रोजी सेव्ह गोवा फ्रंट पक्षाच्या उमेदवारी अर्जाच्या ग्राह्यतेवर निर्णय होणार असून या पक्षातर्फे सादर झालेला अर्ज ग्राह्य धरण्यात आल्यास सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांच्याविरोधातील अपात्रता याचिकेला बळकटी मिळणार आहे व त्यांच्या अपात्रतेचा मार्ग जवळपास निश्चित होण्याची नवी डोकेदुखी सध्या सरकारसमोर उभी ठाकली आहे.
पाळी पोटनिवडणुकीसाठी "सेव्ह गोवा फ्रंट' पक्षातर्फे दोन उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत. सध्या या पक्षात संघटनात्मक वाद निर्माण झाला आहे. दोन गटांकडून पक्षावर आपले वर्चस्व सांगितले जात आहे. या दोन्ही उमेदवारांच्या अर्जांवर पाळी पोटनिवडणुकीसाठी नियुक्त झालेले निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे उद्या यासंदर्भात निर्णय देणार आहेत. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गटाच्या उमेदवाराविरोधात हरकत नोंदवल्याने ही सुनावणी होणार आहे. उद्या कोणत्याही एका गटाच्या उमेदवाराचा अर्ज जरी ग्राह्य धरला तरी त्यामुळे या पक्षाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब होणार असून हा पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीनीकरण केल्याचा चर्चिल आलेमाव व आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांचा दावा फोल ठरणार आहे. पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी यापूर्वीच सभापती प्रतापसिंग राणे यांच्यासमोर चर्चिल व आलेक्स रेजिनाल्ड यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. सेव्ह गोवा फ्रंट हा पक्ष विलीनीकरण झाला नसताना या दोघांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात यावे,अशी मागणी सदर याचिकेत केली आहे. सभापती राणे यांनी याप्रकरणी त्यांना नोटीसही बजावली आहे.
पाळी पोटनिवडणुकीचे वारे घोंगावत असताना आता हा एक नवा वाद निर्माण झाल्याने त्यामुळे राज्यात राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सेव्ह गोवा फ्रंटाचे विलीनीकरण कॉंग्रेसमध्ये करून सरकारात सामील झालेल्या पक्षाच्या दोन्ही आमदारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. पक्ष विलीन केला असला तरी त्याबाबत निवडणूक आयोगाकडून अधिसूचना काढण्यात येते. तीदेखील अद्याप काढण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक आयोगाचे म्हणणे महत्त्वाचे ः ऍड, कासार
सेव्ह गोवा फं्रट पक्षाबाबत निर्माण झालेला हा पेच अभूतपूर्व असल्याचे मत ऍड. अमृत कासार यांनी व्यक्त केले. पक्षात संघटनात्मक वाद निर्माण झाल्याने व अर्जांबाबत हरकती दाखल झाल्याने उद्या निवडणूक अधिकारी सुनावणी घेणार आहेत खरे; परंतु याबाबतीत ते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा सल्ला घेणार असून त्यानुसारच ते निर्णय घेतील. सेव्ह गोवा पक्ष जर खरोखरच कॉंग्रेसमध्ये विलीन झाला असेल तर त्यासंबंधीची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढणे आवश्यक आहे. ही अधिसूचना काढण्यात आली आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या या पक्षाच्या दोन अर्जांपैकी एखाद देखील अर्ज ग्राह्य झाला तर त्याचा अर्थ हा पक्ष अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होणार आहे त्यामुळे चर्चिल व आलेक्स रेजिनाल्ड यांचा पक्ष विलीनीकरणाचा दावा कात्रीत सापडणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अर्थात, अपात्रता याचिकेबाबत निर्णय घेणे हे पूर्णपणे सभापती राणे यांच्यावरच निर्भर असेल,असे त्यांनी सांगितले.
सात अर्ज ग्राह्य
आमच्या डिचोली प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार पाळी पोटनिवडणुकीसाठी सादर झालेल्या अर्जांच्या छाननी आज सुरू झाली असता एकूण सात अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. "सेव्ह गोवा फ्रंट' पक्षात सध्या वाद निर्माण झाल्याने तसेच सध्याच्या परिस्थितीत दोन व्यक्तींकडून पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा होत असल्याने या अर्जाबाबत हरकत घेण्यात आल्याने निर्वाचन अधिकारी अरविंद बुगडे यांनी उद्या ११ रोजी यासंबंधी सुनावणी ठेवली आहे.
आज सकाळी श्री.बुगडे यांच्यासमोर अर्जांची छाननी झाल्यानंतर एकूण सात अर्ज ग्राह्य धरण्यात आले. सेव्ह गोवातर्फे दोन उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. त्यात जोझ लोबो व बाबुसो गावडे यांचा समावेश आहे. या दोन्ही अर्जांवर हरकत घेण्यात आल्याने त्यांच्या ग्राह्यतेबाबत उद्या ११ रोजी सुनावणी होणार आहे. आज ग्राह्य ठरलेल्या अर्जांत डॉ.सुरेश आमोणकर(अपक्ष), डॉ.प्रमोद सावंत(भाजप),प्रताप गावस(कॉंग्रेस),गीता प्रताप गांवस(कॉंग्रेस),राजेंद्र नरसिंह राणे(अपक्ष)सातू मुकुंद माइणकर(अपक्ष) आदींचा समावेश आहे.
Monday, 10 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment