भाजपतर्फे डॉ.प्रमोद सावंत यांची उमेदवारी सादर
डिचोली, दि. ८ (प्रतिनिधी) - पाळी मतदारसंघाची कॉंग्रेसकडून आजपर्यंत सातत्याने फक्त उपेक्षाच करण्यात आली. मगोनंतर कॉंग्रेसनेच सर्वाधिक काळ सत्ता कॉंग्रेसने उपभोगली आहे, त्यामुळे या मतदारसंघाला नेहमी सापत्नभावाची वागणूक देऊन येथील लोकांची फसवणूक केलेल्या कॉंग्रेसच्या भूलथापांना पाळीची जनता मुळीच बळी पडणार नाही. विद्यमान कॉंग्रेस सरकारच्या राजवटीत गोव्याची सुरू असलेली मानहानी पाहता भाजपचे उमेदवार डॉ.प्रमोद सावंत यांना निवडून आणून जनता कॉंग्रेस विरोधातील आपला रोष जाहीरपणे व्यक्त करेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाळी पोटनिवडणुकीसाठी आज भाजपातर्फे डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, म्हापशाचे आमदार, फ्रान्सिस डिसेझा, डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर, मयेचे आमदार अनंत शेट, भाजप मंडळ समितीचे पदाधिकारी, महिला, मोर्चाच्या पदाधिकारी व असंख्य भाजप कार्यकर्ते हजर होते
डॉ.प्रमोद सावंत यांच्या रूपाने तरुण व तडफदार उमेदवार रिंगणात उतरवण्यात आल्याने या परिसरातील भाजप कार्यकर्त्यांत चैतन्यदायी वातावरणांत पसरले आहे. डॉ. सावंत यांनी आपला अर्ज उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांच्याकडे सादर केला. डॉ. प्रमोद सावंत यांनी आपला अर्ज सादर करताना मराठी भाषेतून घेतलेली शपथही आजचे वैशिष्ट्य ठरले. भाजप मराठी भाषेप्रती संवेदनशील असून कोकणी बरोबर मराठीलाही समान न्याय मिळावा यासाठी गेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधेयकही आणले होते,याचीही आठवण यावेळी करून देण्यात आली.
श्रीपाद नाईक म्हणाले, पाळी मतदारसंघात विकासकामे केल्याचे सांगून कॉंग्रेस मतदारांची दिशाभूल करीत आहे. केवळ खर्चाची आकडेवारी लोकांच्या माथी मारून त्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न लोक हाणून पाडतील,असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. डॉ. आमोणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला असला तरी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत व त्यात निश्चितच यश येईल. डॉ. सुरेश आमोणकर भाजपच्या विजयासाठी हातभार लावतील, असेही श्री. नाईक म्हणाले.
पाळी मतदारसंघातील बेरोजगारी दूर करणे, हा परिसर प्रदूषणमुक्त ठेवणे व येथील पायाभूत सुविधा निर्माण करणे हे आपले प्राधान्य असेल असे सांगून आपल्या विजयासाठी भाजपचे शिस्तबद्ध आणि समर्पीत कार्यकर्ते महत्त्वाचे योगदान देत असल्याने १०० टक्के विजयाची खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर म्हणाले, डॉ. आमोणकर यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या १२ तारखेनंतरच एकंदर चित्र स्पष्ट होणार आहे. डॉ. प्रमोद सावंत यांना उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी दिली आहे त्यामुळे त्यांच्या विजयासाठी सारेजण संघटितपणे काम करतील व पाळीत प्रचंड बहुमताने कमळ फुलेल असा विश्वास आपणाला वाटतो.
एकूण १५ अर्ज सादर
पाळी पोटनिवडणुकीसाठी आज (शनिवारी) शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारी अर्ज सादर झाले असून एकूण १५ उमेदवारी अर्जांची नोंद झाली आहे. या उमेदवारांत डॉ. प्रमोद सावंत (भाजप), डॉ.सुरेश आमोणकर (अपक्ष), प्रताप गावस (कॉंग्रेस), गीता प्रताप गावस(कॉंग्रेस), राजेंद्र नरसिंह राणे(अपक्ष), जोस लोबो(सेव्ह गोवा फ्रंट), बाबुसो गावडे(सेव्ह गोवा फ्रंट), सातू मुकुंद माईणकर(अपक्ष), सुभाष मळिक (भाजप) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
Sunday, 9 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment