Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 9 November 2008

गर्दीच्या महासागरात "संभवामि'चा शुभारंभ


फोंडा, दि.८ (प्रतिनिधी) - "संभवामि युगे युगे..' या श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याची पताका जागतिक पातळीवर नेऊन फडकवा, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज संध्याकाळी फर्मागुडी येथे केले.
केरी फोंडा येथील श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाने निर्मित संभवामि युगे युगे या श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याच्या शुभारंभी प्रयोगाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केल्यानंतर शिवशाहीर बोलत होते. यावेळी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, आमदार महादेव नाईक, आमदार दीपक ढवळीकर, मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवशाहीरांनी सर्वांत प्रथम श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्य निर्माण केल्याबद्दल कलाकार, तंत्रज्ञ आणि विजयादुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
शिवशाहीर म्हणाले की, भगवद्गीता चिरंजीव असून त्यात विलक्षण तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. प्रत्येक मनुष्याने श्रीकृष्ण जीवन आणि भगवद्गीता यांचा अभ्यास करून त्या पासून प्रेरणा घेतली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या अंगात कर्मयोग भिनवावा.
श्रीकृष्ण जीवनावर नाट्य उभे राहावे म्हणून आपण गेली दहा वर्षे प्रयत्नशीर होतो. मात्र, हे नाट्य साकार होऊ शकले नाही. विजयादुर्गा मंडळाने श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याची निर्मिती करण्याचे मोठे आव्हान स्वीकारले आणि साकार केले. या महानाट्याचे संयोजन आणि प्रयोग उत्कृष्ट करा. त्याला जाणता राजा चे कलाकारांचे आणि इतरांचे सहकार्य गरज भासल्यास उपलब्ध केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सामाजिक आणि राजकीय पातळीवरील चारित्र्यवान व्यक्ती कशी असावी यासाठी श्रीकृष्ण जीवनाचा अभ्यास करण्याची गरज आहे. श्रीकृष्णा सारख्या व्यक्ती निर्माण होण्याची नितांत गरज आहे, असे सांगून विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर म्हणाले की, श्रीकृष्ण जीवनावरील हे महानाट्य तयार करण्यासाठी कलाकार, तंत्रज्ञ आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे महानाट्य पाहून परत जात असताना ह्या स्फूर्ती घेऊन आदर्श विचाराचे आचरण करण्याचा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे.
श्रीकृष्ण जीवनावरील भव्य अशा महानाट्याच्या शुभारंभामुळे आजचा दिवस हा गोवा आणि भारत देशासाठी एैतिहासातील दिवस आहे, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महानाट्य निर्मितीमागची भूमिका श्री. देसाई यांनी विशद केली. ह्या महानाट्याचे प्रयोग गोवा, भारतातील विविध भागात तसेच परदेशात सुध्दा सादर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे श्री. देसाई यांनी सांगितले. सूत्रधार आणि नटीच्या संवादाच्या माध्यमातून प्रा. भूषण भावे आणि संगीता अभ्यंकर यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सूत्रसंचालन केले. या नाटकाचे लेखक नारायण देसाई, दिग्दर्शक दिलीप देसाई, संगीत दिग्दर्शक अशोक पत्की, नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य, नेपथ्यकार दयानंद भगत प्रकाश योजनाकार सतीश गवस, वेषभूषाकार दिगंबर सिंगबाळ, रंगभूषाकार दास कवळेकर, राजू देसाई यांची ओळख नाट्य रसिकांना करून देण्यात आली. या महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

No comments: