कोकण रेल्वेने सुरक्षा व्यवस्था वाढविली
मडगाव,दि.९ (प्रतिनिधी)- तीन रेल्वेगाड्यांत बॉंब ठेवण्यात आल्याबाबत दहशतवाद्यांकडून काल देण्यात आलेली धमकी ही संबंधित रेलगाड्यांची कसून तपासणी केल्यानंतर अफवाच असल्याचे आज आढळून आले, मात्र या धमकीमुळे मध्यंतरी कोकण रेल्वे सुरक्षा व्यवस्थेत आलेले शैथिल्य दूर होऊन परत एकदा ती व्यवस्था कडक करण्यात आल्याचे जाणवले.
मंगला, नेत्रावती व बिकानेर या तिन्ही लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये बॉंब ठेवल्याची धमकी निनावी फोनवरून आल्यानंतर रेल्वेच्या बेलापूर येथील नियंत्रण कक्षाने गोवा पोलिसांना सतर्क केले होते, त्यानंतर रेल्वे पोलिस यंत्रणा सतर्क झाली व त्यांनी या गाड्यांची जाताना तसेच परततानाही तपासणी सुरु केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाकुलम अर्नाकुलम पहाटे ३ वाजता, नेत्रावती पहाटे ५ वाजता, तर बिकानेर सकाळी १०-५० वाजता मडगाव स्टेशनात दाखल झाल्या असता बॉंबशोधपथकाने श्र्वानपथकाच्या मदतीने त्यांची कसून तपासणी केली.अशीच तपासणी काणकोण व थिवी स्टेशनांवरही केली गेली पण काहीच आक्षेपार्ह सापडले नाही.
कालच्या फोननंतर दिल्लीहून आलेल्या या गाड्या अशाच तपासण्यात आल्या होत्या. मात्र या तपासणीतून जरी काहीच निष्पन्न झालेले नसले तरी गोव्यातील कोकण रेल्वेच्या सर्वस्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था पुन्हा कडक केली गेली आहे. मडगाव स्थानकावर आज सकाळपासूनच पोलिसांची लगबग जाणवत होती. अर्नाकुलम व नेत्रावती जरी कोणत्याही अडथळ्याविना पुढील प्रवासाला रवाना झालेल्या असल्यातरी सकाळी पावणेअकराच्या सुमारास येणारी बिकतानेर दाखल होऊन पुढील प्रवासास निघेपर्यंत सुरक्षा यंत्रणेवरील तणाव कायम राहिला, मात्र ती रवाना झाल्यावर सर्वांनाच हायसे वाटले.
Monday, 10 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment