वाटमारी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय
मडगाव, दि.१० (प्रतिनिधी) - मडगावात काल रात्री उशीरा झालेल्या वाटमारीप्रकरणी पोलिसांनी तिघा परप्रांतियांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. मडगावात अलीकडेच घडलेल्या अशा स्वरूपाच्या घटनांमागे याच टोळीचा हात असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
काल रात्री श्रीपाद साखरे हे आपले दुकान बंद करून मुलासमवेत दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना वाटेत पाजिफोंडला अडवून त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकण्यात आली. नंतर त्यांच्याकडील पैशांची बॅग पळवण्यात आली. तथापि, साखरे व त्यांच्या मुलाने केलेल्या ओरड्यामुळे तेथील लोकांनी एकत्र येऊन पळणाऱ्या शरीफ इस्माईल मुंडा (कंकवारी-मंगळूर) नामक आरोपीला पकडून यथेच्छ चोप दिला व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नौशाद अब्दुल हमीद (२४) व सलीम आदम (क ासरकोड) यांना काल रात्रीच छापा टाकून अटक करण्यात आली. त्यांचा एक साथीदार फरारी झाला असून त्याचे वर्णन सर्व सीमा नाक्यांवर पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या संशयितांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शरीफ याने हा कट रचला होता. ते तिघे कोकण रेल्वे स्टेशनावर एकत्र आले होते व तेथेच हा कट शिजला. काल सकाळी पाजिफोंड भागात पोलिस असल्याची बतावणी करून एका महिलेची सोनसाखळी पळवण्याची जी घटना घडली होती त्यातही याच चौकडीचा हात आहे काय याचा शोध घेतला जात आहे. कारण महिलेने केलेल्या वर्णनाशी ही मंडळी मिळती जुळती आहेत. त्या प्रकरणाचा उलगडा झाल्यास राय येथे तसेच पालिका इमारतीमागे शेल्डेकर यांना अशाच प्रकारे गंडवले जाण्याच्या प्रकारांवरही प्रकाशझोत पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल उत्तररात्री पूर्व बगलरस्त्यावरील "सुप्रीम पार्क'मधील अँड्रयू सांतान सिकेरा यांच्या मालकीच्या बार व रेस्टॉरंटमध्ये चोरी होऊन चोरट्यांनी ७०० रु. ची रोकड पळविळी. त्यालगत असलेला एक टाईल्स शोरूम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला; पण त्याच्या मालकाने पोलिस तक्रार करण्यास नकार दर्शवला.
फातोर्डा येथेही असाच एक प्रकार घडला. तथापि, तेथे एमएच ०१ ए १२२२ क्रमांकाची एक मोटरसायकल सापडली व ती चोरीस गेल्याची तक्रार आज पोलिसांत नोंदवली गेली. सदर वाहनाचा उपयोग चोरीसाठी केला जात असावा असा पोलिसांचा कयास आहे.
Monday, 10 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment