मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी) - मडगावच्या नगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक सॅव्हियो कुतिन्हो यांची अपेक्षेप्रमाणे अविरोध निवड झाली. सकाळी ११ वाजता या निवडीसाठी बोलावलेल्या विशेष बैठकीस निर्वाचन अधिकारी म्हणून दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य उपस्थित होते.
नगराध्यक्षपदासाठी काल उमेदवारी दाखल केलेल्या जॉन्सन फर्नांडिस व श्रीमती पिएदाद नोरोन्हा या दोघा माजी नगराध्यक्षांनी आज बैठक सुरू होताच आपले उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे व मडगाव शहराच्या विकासासाठी कुतिन्हो यांना संधी देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर निर्वाचन अधिकाऱ्यांनी कुतिन्हो यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
गेल्या तीन वर्षांत कुतिन्हो हे मडगावचे पाचवे नगराध्यक्ष झाले आहेत. पालिका निवडणुकीनंतर प्रथम श्रीमती नोरोन्हा नगराध्यक्ष बनल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांना खाली उतरवून घनःश्याम शिरोडकर नगराध्यक्ष झाले. कॉंग्रेसप्रणीत नगरसेवकांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना पाडले व भाजपच्या मदतीने राजेंद्र आजगावकरांना नगराध्यक्ष केले. त्यावेळी भाजपाचे आठ नगरसेवक होते. नंतर राजू नाईक, रामदास हजारे व राजेंद्र आजगावकर यांनी भाजपची फारकत घेतल्याने भाजपप्रणीत नगरसेवकांचे संख्याबळ पाचच राहिले. मध्यंतरी पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा परिणाम राजेंद्र आजगावकर यांना भोगावा लागला. त्यांना नगराध्यक्षपदावरून बाजूला काढले गेले व त्याजागी भाजपच्या मदतीने जॉन्सन आले. मागील चारही नगराध्यक्ष बनवण्यात भाजपाचा मोठा वाटा होता. चारही वेळी कुतिन्होंनी नगराध्यक्ष होण्याचा प्रयत्न केला; पण पुरेशी संख्या नसल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र आता पाचव्यांदा त्यांना यश प्राप्त झाले आहे.
नगराध्यक्षपदी निवडीनंतर कुतिन्हो यांनी सर्वांचे आभार मानले व मडगाव शहराच्या विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. त्यांनी आपण मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन विकासकामांसाठी जादा निधी आणण्याचे आश्र्वासन दिले. मडगाव पालिकेत सत्तेच्या या संगीतखुर्चीत नगराध्यक्षपद नेहमीच अस्थिर राहिले व त्याचा फटका विकासकामांना बसला.
Saturday, 15 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment