रात्री उशिरा सुटका
कुडचडे, दि. १२ (प्रतिनिधी) -कोळंब रिवण येथे हिरालाल कोडिदास खाण कंपनीतर्फे गेला एक महिना जोरात सुरु असलेल्या खनिज उत्खननाच्या विरोधात आज तेथील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले. शंभराहून अधिक जणांनी कंपनी बंद करण्याची मागणी करीत मोर्चा काढल्यानंतर खाजगी जागेत बेकायदा प्रवेश केल्याचा आरोप ठेवून केपे पोलिसांनी ८७ जणांना अटक केली, त्यांची रात्री उशिरा जामिनावर सुटका करण्यात आली. खाण बंद होईपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तिंबलो कंपनीकडून लीजवर घेऊन चालविण्यात येणाऱ्या या खाणीला गेली तीन वर्षे येथील ग्रामस्थ विरोध करीत आहेत. डोंगरावरील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे, शिवाय अनेकांची शेती व बागायती आणि कुळागरे या खाणीमुळे धोक्यात आली असली तरी राजकीय वरदहस्त असल्याने बिनभोबाटपणे खाण सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
काही जणांना रोजगार देऊन, काही जणांच्या मालकीचे ट्रक कामावर ठेवून ग्रामस्थांना आपल्याकडे वळविण्याचे कंपनीचे धोरण आहे, असे असले तरी आज १२० जणांनी काही बिगरसरकारी संस्थांच्या कार्यकर्त्यांसमवेत आज रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी केपेचे पोलिस अधीक्षक रोहिदास पत्रे, निरीक्षक संतोष देसाई, निलेश राणे, मामलेदार सुदिन नातू, संयुक्त मामलेदार अमोल गावकर उपस्थित होते.मामलेदारांनी जागा सोडून बाहेर जाण्याचा आदेश दिला, तथापि ग्रामस्थांनी आपले धरणे कायम ठेवल्याने त्यापैकी ८७ जणांना पोलिस ठाण्यावर नेण्यात आले. ही खाण कायदेशीर असून संबंधित कंपनीकडे सर्व प्रकारचे आवश्यक दाखले असल्याचे पोलिस निरीक्षक पत्रे यांनी सांगितले. पुन्हा ग्रामस्थांनी अशा प्रकारे निषेध केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रामा वेळीप, डॉ.अवधूत प्रभुदेसाई, फादर मॅथ्यु , ३५ महिलांसह ८७ लोकांचा समावेश होता. त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
Thursday, 13 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment