रवींद्र दाणी
नवी दिल्ली, दि.९ - संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या साऊथ ब्लॉकने काल बेलगाम "एटीएस'वर "ब्रेक" लावला. महाराष्ट्राचे "एटीएस' परवापर्यंत आणखी दोन कर्नल व एका मेजरच्या चौकशीची भाषा बोलत होते. पण, काल एटीएस प्रमुखांनी मुंबईत एक पत्रपरिषद घेऊन लेफ्ट. कर्नल पुरोहित यांच्याव्यतिरिक्त लष्करातील आणखी कोणत्याही अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येणार नाही असे घोषित केले. राजधानीत घडलेल्या घडामोडींनी हादरलेल्या एटीएसला काल पत्रपरिषद घेऊन ही घोषणा करावी लागली .
मिलिटरी इंटेलिजन्स
मिलिटरी इंटेलिजन्सने आपला अहवाल लष्करप्रमुखांना दिल्यानंतर लष्कराने याबाबतीत अतिशय आक्रमक भूमिका घेतली असे समजते. लष्करप्रमुख प्रथम चिंताग्रस्त होते, पण मालेगाव स्फोटामागे पुरोहित नाहीत हे मिलिटरी इंटेलिजन्सने स्पष्ट केल्यानंतर या चिंतेची जागा संतापाने घेतली. लष्कराच्या बदनामीने संतप्त झालेल्या जनरल दीपक कपूर यांनी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी चालविलेली लष्कराची बदनामीची मोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला. जनरल कपूर यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संरक्षण मंत्री ए. के. ऍण्टोनी यांच्याशी चर्चा केली. संरक्षणमंत्र्यांनी नंतर गृहमंंत्री शिवराज पाटील यांना सारी कल्पना दिली. शिवराज पाटील यांनी गृहसचिव मधुकर गुप्ता यांना पुढील कारवाई करण्यास सांगितले.
तीव्र नाराजी
महाराष्ट्र एटीएसजवळ पुरोहित यांच्याविरुध्द कोणताही पुरावा नाही. आता आणखी सेवारत अधिकाऱ्यांना अटक करुन परिस्थिती चिघळवू नका असा स्पष्ट निर्देश महाराष्ट्र पोलिसांना देण्यात आला. एवढेच नाही तर याची जाहीर घोषणा करा असेही सांगण्यात आले. त्यानंतरच करकरे यांनी काल मुंबईत पत्रपरिषद घेऊन यात लष्कर गुंतलेले नाही अशी घोषणा केली.
आश्रम-साधू-संत
लष्कराने सज्जड दम दिल्यानंतर एटीएसने आता आश्रम-साधू-संत यांना टारगेट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. वेगवेगळ्या राज्यातील आश्रमांवर धाडी घालणे, नवनवी माहिती लिक करणे हे नवे धोरण एटीएसतर्फे राबविले जाणार असल्याचे कळते.
Monday, 10 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment